अनेकदा कोणताही विषय पूर्णपणे समजून घेण्यासाठी भूतकाळात डोकावणे आवश्यक असते. गुजरातच्या दंगलींबाबतही हे खरे आहे. गोधरा नंतर उसळलेल्या दंगलीमध्ये ११६९ लोक मारले गेले. एवढेच लोक महाराष्ट्रातील नागपूर शहरात दंगलींत मारले गेले असते, तर त्यांना ‘मोठ्या दंगली’ असे म्हटले गेले असते. कारण नागपूर विभागात १९२७-२८ नंतर जवळ-जवळ कोणत्याच सांप्रदायिक, धार्मिक दंगली झालेल्या नाहीत. पण २००२ च्या दंगली गुजरातमध्ये झाल्यामुळे त्यांचे सर्व संदर्भ लक्षात येण्यासाठी गुजरातमधील सांप्रदायिक दंगलींचा इतिहास पाहायला हवा.
गुजरातमधील हिंसाचाराच्या रक्तरंजित इतिहासाकडे नजर टाकली, तरी मार्च २००२ मधील दंगली तुलनेने लहान होत्या, असे लक्षात येईल. गुजरातमध्ये सर्वात भयंकर दंगली झाल्या त्या १९६९ आणि १९८५ मध्ये. त्याशिवाय १९८०, १९८२, १९९० आणि १९९२ या वर्षांतही मोठ्या दंगली उसळल्या होत्या.
१३०० पेक्षा जास्त वर्षे हिंदू मुस्लिमांमधील संघर्ष चालूच आहे. पण गुजरातमध्ये हिंदू मुस्लिमांच्या दंगली इ.स. १७१४ पासून सुरू झाल्याची नोंद आहे. संघपरिवारातील कोणत्याही संघटनेचा जन्म होण्याआधी काही शतके या दंगली सुरू झाल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना इ.स. १९२५, भारतीय जनसंघ स्थापना इ.स. १९५१, विश्व हिंदू परिषद स्थापना इ.स. १९६४ आणि भारतीय जनता पक्ष स्थापना इ.स. १९८० असा हा क्रम आहे. आजही भारतामध्ये हिंदू-मुस्लिमांमध्ये, चीनमध्ये मुस्लिम आणि बौद्ध, नायजेरिया, अल्जेरिया, फिलिपीन्स, मोरोक्को आणि चेचेन्यामध्ये मुस्लिम-ख्रिश्चन यांच्यात संघर्ष चालू आहे. यामध्ये कोठेही विहिंप किंवा संघपरिवार हे सामान्य घटक नाहीत.
भारतातील हिंदू-मुस्लिम संघर्ष, लढाया, युद्धे आणि दंगली या स्वरूपात सुरू झाला, तो इ.स. ६३६ पासून, प्रथम अरबांनी मुंबईजवळच्या ठाणे शहरावर आक्रमण सुरू केले तेव्हापासून. महंमद बिन कासिमने इ.स. ७१२ मध्ये सिंधवर आक्रमण केले आणि राजा दाहिरचा पराभव केला. इ.स. ७१२ च्या पूर्वीही परकीय मुस्लिम आक्रमक भारतावर लहान-मोठी आक्रमणे करतच होते, इ.स. ६३६ पासून. स्वातंत्र्यवीर सावरकर (१८८३-१९६६) यांनी ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकात लिहिले आहे की इ.स. ७१२ ते १००१, या सुमारे ३०० वर्षांत वायव्य आणि पश्चिम सीमेवरील हिंदू राजांनी मुस्लिम आक्रमकांचा सातत्याने पराभव केला, गजनीचा महंमद इ.स.१००१ मध्ये आक्रमण करून आला तोपर्यंत. सावरकरांनी आपल्या ग्रंथात इ.स. ६३६ मध्ये ठाणे बंदरावर झालेल्या आक्रमणाचाही उल्लेख केला आहे.
सांप्रदायिक दंगली भारताला नव्या नाहीत. इ.स १८८० पासून गेल्या सव्वाशे वर्षात देशात कुठे ना कुठे पुन्हा पुन्हा दंगली होतच होत्या. पण देशातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा गुजरात सांप्रदायिक तणावाच्या दृष्टीने सर्वाधिक संवेदनशील राज्य होते.
गुजरात विश्व संवाद केंद्राने म्हटले:
“अहमदाबाद शहराचा ५०० वर्षांचा इतिहास पाहिला, तर त्यातील ३४० वर्षे या शहरावर मुस्लिम आणि मोगलांचे राज्य होते. उरलेला काळ, मराठा आणि ब्रिटिशांचे राज्य होते. या ५०० वर्षांतील सांप्रदायिक दंगलींचाच विचार करायचा, तर काही मोठ्या घटना अशा-
१) १७१४ : होळीच्या दंगली
हरिराम नावाचा एक हिंदू आपल्या मित्रांसमवेत आपल्या घरात होळी खेळत असताना, त्याने उडविलेला गुलाल एका मुस्लिमाच्या अंगावर चुकुन पडला. याला काही मुस्लिमांनी विरोध केला. पाठोपाठ सुन्नी बोहरा मुल्ला अब्दुल अझीझ याच्या नेतृत्वाखाली जुम्मा मशिदीजवळ संतप्त जमाव एकत्र झाला. मुस्लिम राज्यकर्त्याचे अफगाण सैनिकही या जमावात सामील झालेत. या संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न एका काझीने केला, तेव्हा जमावाने या काझीचे घर जाळले वा नंतर हिंदू वस्तीतील दुकाने, घरेदारे लुटली आणि नंतर जाळली. एक हिंदू कपूरचंद भन्साळी याच्या जवळ असणार्या सशस्त्र सैनिकांमुळे या दंगली आटोक्यात आल्या.
२) इ.स. १७१५ च्या दंगली
मुस्लिम सैनिकांनी हिंदूंची दुकाने लुटल्याच्या कारणामुळे या दंगली सुरू झाल्यात. मुस्लिम शासकांचा प्रतिनिधी दाऊद खान याला हटविल्यानंतर या दंगली थांबल्यात.
३) इ.स. १७१६: ईदच्या दंगली
सलग तिसर्या वर्षी इ.स. १७१६ मध्ये ईदच्या निमित्ताने दंगली उसळल्या. ईद साजरी करण्याच्या निमित्ताने बोहरा समाजाने गायी आणि म्हशी कत्तलीसाठी आणल्या होत्या. एक मुस्लिम हवालदाराला दया येऊन त्याने त्यापैकी एक गाय सोडून दिली. काही मुस्लिमांनी याबद्दल काझी खैरूल्ला खान याच्याकडे तक्रार केली. पण त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काझीने काही कारवाई केली नाही. त्यामुळे जमावाने हिंदू वस्त्यांवर हल्ला चढवला. हिंदूंची दुकाने, घरे यांची लुटालूट केली आणि नंतर त्यांना आगी लावल्या. हिंदू सरदार अजितसिंग याच्या प्रयत्नांमुळे परिस्थिती पूर्वपदावर आली.
४) इ.स. १७५० : मंदिर पाडले
‘जवळच्या मंदिरातील घंटानादामुळे आमच्या नमाजात अडथळा येतो’ असे सांगून मुस्लिमांनी ही दंगल सुरू केली आणि नमाज पढून परतताना ते मंदिर उद्ध्वस्त केले.
५) सप्टेंबर १९२७ : अहमदाबाद दंगली
मशिदीत सुरू असलेली मुस्लिम प्रार्थना आणि हिंदू मंदिरात त्याचवेळी सुरू सलेले भजन, हे या दंगलीचे कारण सांगितले जाते.
६) इ.स. १९४१ च्या दंगली
१८ एप्रिल १९४१ला दंगली सुरू झाल्यात. दंगलींनंतर मुसलमान मुस्लिम लीगच्या कार्यक्रमांना लागू करु लागले.
७) इ.स. १९४६ : रथयात्रा दंगली
१ जुलै १९४६ ला शहर कोटडा पोलीस ठाण्यावरून रथयात्रा जात होती. ही रथयात्रा पाहणारा एक मुस्लिम आणि हिंदू आखाड्याची एक व्यक्ती, यांच्यात बाचाबाची झाली आणि त्यातून दंगल उसळली. दगडफेक, भोसकाभोसकी, जाळपोळ यांचे सत्र सुरू झाले. ते थांबविण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. स्थिती आटोक्यात आणायला अखेर संचारबंदी लागू झाली.
८) इ.स. १९५३ : अहमदाबाद दंगली
गणपती उत्सव आणि मोहर्रम या प्रसंगांच्या वेळी अहमदाबादमध्ये दंगली उसळल्या.
९) इ.स. १९६५ : शीख दंगली
काही मुस्लिमांनी दोन शीख रिक्षा चालकांचा खून केल्यावरून या दंगली सुरू झाल्या. शीख समाजाने दोन्ही रिक्षा चालकांचे मृतदेह घेऊन मोठी अंत्ययात्रा काढली. पण दिल्ली दरवाजाजवळ स्थिती बिघडली व त्यातून मोठ्या दंगली सुरू झाल्यात.
१०) इ.स. १९६९ : ऐतिहासिक दंगली
१८ सप्टेंबर १९६९ ला उरुसाचा शेवटचा दिवस होता. संध्याकाळच्या वेळी अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिरात पाळलेल्या गायी चरून परत मंदिरातील गोठ्यात जात होत्या. वर्षानुवर्षांचा हा नित्यक्रम होता. पण गायींच्या जाण्यामुळे उरुसात विघ्न आले, असे सांगून बाचाबाची सुरू झाली. त्यातून भोसकाभोसकी, हत्या यांची अहमदाबादच्या अनेक भागात साखळीच तयार झाली. कित्येक दिवस चाललेल्या या दंगलींत हजारो लोकांना प्राण गमवावे लागले. स्वतंत्र भारतातील या सर्वांत मोठ्या दंगली म्हणाव्या लागतील.
इतर गाजलेल्या दंगलींमध्ये १९८५ ची राज्यभर पसरलेल्या दंगली, अहमदाबाद आणि गोधरामधील १९८० आणि १९८२ च्या दंगली, राज्यातील १९९०, १९९२ मधील दंगली यांचा समावेश आहे.”
‘हिमल’ साऊथ एशियन मासिकात मे २००२ मध्ये हेमंत बाबू यांचा एक लेख प्रकाशित झाला आहे. तो आपण पाहू (पुनः प्रकाशित केला www.countercurrents.org यांनी):
‘‘सामान्य स्थिती चे मूल्यमापन राज्यात हिंसक दंगलीच्या घटनांची अधिकृतपणे झालेल्या नोंदेची आकडेवारी यावरून करता येईल. १९६९ आणि १९८५ च्या दंगलींनंतर न्या. रेड्डी आयोग आणि न्या.व्ही.एस. दवे आयोग न्यायिक चौकशीसाठी नेमण्यात आले होते. या दोन्ही आयोगांनी गुजरातच्या जातीय दंगलीच्या इतिहासाची दखल घेतली आहे. न्या. दवे आयोगाने तर इ.स. १७१४ मधील होळीदरम्यान झालेल्या दंगलीचाही इतिहास लक्षात घेतला आहे. त्यावेळी अहमदाबाद शहर मोगलांच्या नियंत्रणाखाली होते. त्यानंतर १७१५, १७१६ आणि १७५० मध्ये दंगली झाल्या…पुढल्या शतकांमध्येही हिंदू मुस्लिम दंगली होतच राहिल्या आणि विसाव्या शतकाच्या मध्यानंतर त्यांना जोर आला. १९४१ मध्ये दंगली भडकल्या तेव्हा दोन अडीच महिने संचारबंदी लागू करावी लागली होती. १९६० ते १९६९ या वर्षांत २,९३८ जातीय संघर्षाच्या घटना घडल्याची नोंद न्या. रेड्डी आयोगाने केली आहे. म्हणजे या १० वर्षांत प्रत्येक चार दिवसात ३ दंगली झाल्या, अशी सरासरी आहे…
या काळात झालेल्या दंगली राज्यातील विविध भागांत पसरल्या. त्यामध्ये वेरावळ, जुनागड, पाटण, गोधरा, पालनपूर, अंजार, दालखनिया, कोडिनार आणि दिसा या शहरांमध्येही दंगलींची मोठी झळ बसली. ही सर्व शहरे या २००२ च्या हिंसेतही प्रभावित आहेत.
…१९६९ मधील दंगल मात्र वेगळी होती. ती पद्धतीशीरपणे पेटविण्यात आली दीर्घकाळ सुरू राहिली. हिंदू मुस्लिम दंगलींतील तोपर्यंतचा पॅटर्न इथे पूर्णपणे बदलला…
…या दंगली सर्वच अर्थाने प्रचंड व अभूतपूर्व होत्या. इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि प्रदीर्घ काळ कुठ्ल्याच दंगली झाल्या नव्हत्या…१९६९ च्या दंगलींनी मात्र सामाजिक तणावाला कधीही, कोणत्याही क्षणी पद्धतशीरपणे भडकविता येते, याचे उदाहरण घालून दिले. १९६९ दंगलींना राज्यात आणि देशभरातही भरपूर प्रसिद्धी मिळाली. गुजरातमध्येच नव्हे, तर इतरत्र कोठेही आपल्या इच्छेप्रमाणे हवा तेव्हा धार्मिक तणाव निर्माण करता येऊ शकतो, हे या दंगलींने दाखवून दिले…
…१९८५ मधील दंगल १९ मार्चला सुरू झाली. नव्याने निवडून आलेल्या कॉंग्रेस सरकारने सत्ता स्वीकारताच दुसर्या दिवशी ही दंगल झाली आणि तिचे कारण दोन महिने आधी जाहीर केलल्या धोरणामध्ये होते. आधीच्या कॉंग्रेस सरकारने मागास जातींसाठी असलेल्या जागांच्या कोट्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय जानेवारीमध्ये जाहीर केला होता. त्यामुळे सरकारी नोकर्यात आणि सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये मागास कोट्यात वाढ होणार होती. यामधून उद्भवलेल्या दंगली ६ महिने सुरू हात्या. सरकारला आपले धोरण मागे घ्यावे लागले, त्यानंतरही पुष्कळ काळ दंगली चालल्यात… या दंगलींमध्ये इतर घटकांबरोबरच गुंडांच्या टोळ्या, लुटारू आणि व्यावसायिक खुनी सहभागी झाले होते…
अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशीद कारसेवकांनी उद्ध्वस्त केली, तेव्हा १९९२ मध्ये गुजरातमध्ये पुन्हा दंगली उसळल्या. सुरत शहरात तर सहा महिने सतत काही ना काही उपद्रव चालूच होता. १९९३ मध्ये मुंबईतील बॉंबस्फोटानंतर पुन्हा दंगली उसळल्या. हे बॉंबस्फोट दाऊद इब्राहिमने घडवून आणल्याचा आरोप आहे. कदाचित या उसळलेल्या दंगली हिंदूंमध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी होत्या, जे ऐक्य होणे बाहेरुन शक्य वाटत नव्हते…१९९५ मध्ये गुजरातमध्ये भाजपा सत्तेवर आल्यानंतर पुढे सतत ३ वर्षे राज्य दंगलींपासून मुक्त होते…’’
हा लेख भाजपाविरोधी म्हणून ओळखल्या जाणार्या लेखकाने लिहिला आहे आणि ज्या वेबसाइटने तो पुन्हा प्रसारित केला, ती वेबसाइट संपूर्ण इंटरनेटवरील सर्वाधिक भाजपाविरोधी असलेल्यांपैकी समजली जाते. संघ परिवारावर हल्ला चढविण्याच्या हेतूनचे लिहिलेल्या या लेखात काही महत्त्वाच्या गोष्टी मात्र स्पष्टपणे समोर आल्या. त्यापैकी एक म्हणजे गुजरातमधील हिंसाचाराचा रक्तरंजित इतिहास.
गोधरा शहरात १९२७-२८ पासून होत असलेल्या दंगलीचा इतिहास आपण पाहिला आहे. विश्व संवाद केंद्राने १९६९, १९८५ आणि २००२ च्या दंगलींचे विश्लेषण करणारा एक अहवाल तयार केला आहे. २००२ च्या दंगलींमध्ये ३ मार्च २००२ पर्यंतच्या घडलेल्या घटनांचे वर्णन आहे. तो अहवाल पुढे देत आहे-
“१९६९, १९८५ आणि २००२ च्या सांप्रदायिक दंगलींत सरकारच्या भूमिकेचा तुलनात्मक अभ्यास
सांप्रदायिक तणाव ही गोष्ट गुजरात राज्यासाठी नवीन नाही. सध्याच्या ‘गोधरा’ नंतर उद्भवलेल्या दंगलींआधी १९६९ आणि १९८५ मध्ये मोठ्या सांप्रदायिक दंगली झाल्या होत्या. या दोन्ही दंगलींची कारणे शोधण्यासाठी आणि प्रशासनाने बजावलेल्या भूमिकेचा तपास करण्यासाठी सरकारने दोन वेगवेगळे न्यायालयीन आयोग नेमले होते…
१८ सप्टेंबर १९६९ ला अहमदाबादमध्ये मोठी दंगल सुरू झाली आणि नंतर ती राज्यातील इतर जिल्ह्यांतही पसरली…या दंगलींबाबतची चौकशी न्या. जगमोहन रेड्डी यांच्या आयोगाने केली. १९६९ नंतर मोठी चळवळ आणि दंगली उसळल्या, त्या १९८५ मध्ये. मुळात आरक्षणाविरोधी आंदोलन फेब्रुवारी १९८५ मध्ये सुरू झाले आणि त्याला सांप्रदायिक दंगलींचे स्वरूप येऊन जुलै १९८५ पर्यंत त्या चालू राहिल्या. या दंगलींची चौकशी न्या. दवे आयोगाने केली.
या आधीच्या दोन्ही दंगलींत आणि आताच्या (२००२ च्या) दंगलींत सरकारची भूमिका काय होती, याबद्दलचे महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत, ते असे-
१९६९ मधील दंगल १८ सप्टेंबरला दुपारी ३.४५ वाजता सुरू झाली. २१ सप्टेंबर १९६९ ला दुपारी ४.३० वाजता लष्कराला (केवळ ३ पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रात) तैनात करण्यात आले, तर संपूर्ण शहरात लष्कराला २२ सप्टेंबरला संध्याकाळी ६ वाजता तैनात करण्यात आले. १९८५ मध्ये १५ एप्रिलला दंगल सुरू झाली आणि लष्कराला १६ एप्रिलला पाचारण करण्यात आले. त्यापूर्वीच १७७ लोक मृत्यूमुखी पडले होते. त्याच्या तुलनेत आताच्या (गोधरा) घटनेत २८ फेब्रुवारीलाच लष्कराला पाचारण करण्यात आले. यावेळी संपूर्ण लष्कर सीमेवर तैनात असतानाही ते अहमदाबादमध्ये तातडीने पोचले, हे लक्षात घेतले पाहिजे. १९६९ व १९८५ मध्ये पूर्ण लष्कर सीमेवर नव्हते. लष्कर सीमेवर असल्याने अल्पावधीत गुजरातमध्ये पोचणे अवघड होते. पण गुजरातमधील दंगलींची सद्य:स्थिती मुख्यमंत्र्यांनी (नरेंद्र मोदी) पंतप्रधानांच्या (अटलबिहारी वाजपेयी) आणि संरक्षण मंत्र्यांच्या (जॉर्ज फर्नांडिस) कानावर घातली आणि तातडीने लष्कर पाठविण्याची मागणी केली. केंद्र सरकारनेही वेगाने निर्णय घेऊन त्याच रात्री (२८ फेब्रुवारीच्या) लष्कराला विमानाने अहमदाबादला पोचविले. लष्करी कारवाईला आवश्यक असणार्या तांत्रिक बाबी म्हणजे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट नेमणे, लष्करासाठी वाहने देणे, इत्यादी गोष्टी रात्रीच (२८ फेब्रुवारीच्या) पूर्ण झाल्यामुळे लष्कर सकाळीच तैनात होऊ शकले. १९६९ मध्ये घटना १८ सप्टेंबरला घडली. पण पाचव्या सहाव्या दिवसापर्यंत दंगली नियंत्रणात आल्या नव्हत्या. सहाव्या दिवसानंतरही हिंसाचाराच्या घटना घडतच होत्या. १९८५ मध्ये दंगली फेब्रुुवारी ते जुलै अशा ५-६ महिने चालू होत्या. याउलट २००२ च्या प्रकरणात परिस्थिती तिसर्या-चौथ्या दिवशीच नियंत्रणात आली.
सध्याच्या प्रकरणात गोधरातील हत्याकांड घडल्यापासून केवळ ४ तासात त्याच दिवशी संचारबंदी लागू झाली. (खरे तर दोनच तासात, सकाळी ९:४५ ला!) या पार्श्वभूमीवर पूर्वीच्या २ दंगलींकडे पाहिले, तर संचारबंदी लागू करण्यास खूप उशीर झाला. हा उशीर का झाला, याची तक्रारही चौकशी समितीसमोर करण्यात आली.
पोलीस आणि स्थानिक प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय राहिल्याच्या तक्रारी चौकशी आयोगासमोर करण्यात आल्या. सध्याच्या प्रकरणात मात्र गुजरातमध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी आणि हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने प्रो-ऍक्टीव्ह भूमिका बजावली. ३ मार्च २००२ पर्यंत पोलिसांनी गोळीबाराच्या ३९०० फैरी झाडल्या (वास्तवात ५४५०), अश्रुधुराची ६५०० नळकांडी फोडली आणि २८०० पेक्षा जास्त लोकांना अटक केली. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पोलीस गोळीबारात ९० लोक ठार झाले. (खरा आकडा ९८) याचा अर्थ पोलिसांनी दंगलखोरांबद्दल कोणतीही नरमाईची भूमिका घेतली नव्हती…
या सर्व मुद्द्यांचा स्पष्ट अर्थ असा, की या वेळच्या दंगलीत हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी सरकार त्वरेने आणि परिणामकारकपणे हलले आणि त्यासाठी उच्च दर्जाची इच्छाशक्ती सरकारने दाखवली.’’ (संदर्भ: VSK, Gujarat www.vskgujarat.com)
गुजरात विधानसभेची निवडणूक १२ डिसेंबरला होणार होती. त्याच्या एक आठवडा आधी एनडीटीव्ही-स्टार न्यूज वाहिनीने ‘द बिग फाइट’ नावाचा कार्यक्रम अहमदाबादमधून लाईव्ह प्रसारित केला. या कार्यक्रमात भाजपाच्या वतीने हरीन पाठक (अहमदाबादचे खासदार) कॉंग्रेसचे शंकरसिंह वाघेला आणि एक दंगलग्रस्त प्रा. बंदूकवाला हे सहभागी झाले होते. या चर्चेत बोलताना हरीन पाठक यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ मध्ये १९६९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखाचा दाखला दिला. या लेखानुसार १९६९ मधील दंगलीत ठार झालेल्यांचा अधिकृत आकडा ५ हजार होता, तर वास्तवात तो यापेक्षा ३ ते ५ पट होता. त्यावेळी गुजरातमध्ये कॉंग्रेस पक्ष सत्तेवर होता आणि मुख्यमंत्री म्हणून नामवंत गांधीवादी हितेंद्र देसाई काम करीत होते. पाठक यांनी दिलेल्या लेखाचा हवाला पाहता, १९६९ मधील दंगलीतील मृतांचा आकडा १५ ते २५ हजारांवर जाऊन पोचतो. २००२ च्या दंगलीत, कॉंग्रेसच्या केंद्रीय मंत्र्याने दिलेल्या आकडेवारीनुसार, ७९० मुस्लिम आणिा २५४ हिंदू मारले गेले, तर एकूण २२३ लोक बेपत्ता होते,ज्यातील अनेक नंतर जीवंत सापडले, व शेवटी १२७ लोक बेपत्ता होते.
देवेंद्र स्वरूप यांनी ‘ऑर्गनायझर’ साप्ताहिकाच्या १६ ते २००४ च्या अंकात लिहिले-
‘‘महात्मा गांधींचे नाव आणि विचार आपल्याला भावूक बनवीत असले, तरी ते इतिहासाशी मेळ खात नाहीत. गुजरातच्या सांप्रदायिक दंगलीच्या इतिहासापुढे सन्माननीय न्यायमूर्तींनी दुर्लक्ष केले आहे. गांधी हयात असतानाच गुजरातने भयंकर सांप्रदायिक दंगली अनुभवल्या आहेत. १९२४ मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या दंगलींमुळे त्यांना किती वेदना झाल्या होत्या, याचे दर्शन त्यांच्या संपूर्ण लेखनात (Complete Works) होते. स्वातंत्र्यानंतर गोधरा आणि अहमदाबादच्या मुस्लिमबहुल भागात दंगली पसरल्याचे पाहण्यास मिळाले. सोमनाथ मंदिराचे पुनरुज्जीवन थांबविण्यासाठी गझनीच्या महंमदाला पाठविलेल्या निमंत्रणामुळे गांधीजी अत्यंत घायाळ झाल्याचे दिसते. गांधीजी हयात असताना आणि त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचा वारसा सांगणार्या कॉंग्रेस पक्षाच्या राजवटीतच गुजरातमध्ये सर्वाधिक सांप्रदायिक दंगली झाल्या. १९६९ मध्ये गांधीवादी नेते हितेंद्र देसाई मुख्यमंत्री म्हणून सत्तेवर असतानाच सांप्रदायिक दंगलीत ३ हजारांहून अधिक लोक मारले गेले. २००२ च्या दंगलीतील मृतांपेक्षा कितीतरी अधिक. म्हणूनच विचारधारांच्या वादात अडकून न बसता, गुजरातमध्ये सांप्रदायिक दंगलींची न थांबणारी साखळी का सुरू आहे, याचा शोध घ्यायला हवा…’’
देवेंद्र स्वरूप यांनी आपल्या लेखात १९६९ च्या दंगलीत अहमदाबादमध्ये केवळ ३ हजार लोक मृत्युमुखी पडले, असे म्हटले आहे. त्यांनी दिलेला आकडा फक्त अहमदाबादचा आहे आणि सावधपणे दिला आहे. जर १९६९ च्या ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या बातमीत दिलेला आकडा खरा असेल, तर प्रत्यक्षात अधिकृत सरकारी आकडा ५ हजार, व वास्तवात १५ ते २५ हजार आहे. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिन पाठक यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या या लेखाचा संदर्भ दिला होता.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने १२ एप्रिल २००२ ला आपल्या ऑनलाइन आवृत्तीत दिलेल्या बातमीत म्हटले-
“क्षुल्लक कारणानेच पेटल्या आधीच्या दंगली
अहमदाबाद: एकविसाव्या शतकात व्यापक सांप्रदायिक दंगली गुजरातमध्ये होण्यासाठी गोधरासारखे धक्कादायक हत्याकांड कारण लागले असले, तर इतिहास असे सांगतो की विसाव्या शतकातील बहुतेक दंगली क्षुल्लक कारणांनीच झाल्यात. १९८५ मधील आरक्षणविरोधी आंदोलन आणि नंतरच्या जातीय दंगली, यांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या न्या. दवे आयोगाने आपल्या अहवालातील एक संपूर्ण प्रकरणच ‘गुजरातमधील आंदोलने आणि दंगलींचा इतिहास’ यासाठी खर्ची घातले आहे. १७१४ पासूनच्या दंगलींचा शोध घेताना त्यांची कारणे, सण, धार्मिक उत्सव, आक्रमण आणि वस्त्यांचे बदलते हिंदू-मुस्लिम प्रमाण (अधिक सुरक्षेच्या ठिकाणी स्थलांतर केल्यामुळे)…१८ एप्रिल १९४१ ला अहमदाबादमध्ये सांप्रदायिक दंगली भडकल्या, तेव्हा बहुसंख्य भागात संचारबंदी लागू करण्यात आली आणि ती अडीच महिने कायम होती. या दंगलींमुळे कॉंग्रेसने सुरू केलेली असहकाराची चळवळ अहमदाबादमध्ये ऑक्टोबर १९४१ पर्यंत विलंबित ठेवावी लागली. या दंगलींमुळे अहमदाबादमध्ये आणि राज्यातील इतर भागातही दोन्ही समाजांना मोठे नुकसान सोसावे लागले. या दंगलींचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम झाल्याचे आयोगाने नोंदवले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ‘‘या घटनांनंतर, १९४१ च्या दंगलीनंतर, अहमदाबादमधील मुस्लिामांनी आपला मोर्चा मुस्लिम लीगकडे वळविला.’’ यानंतर पाठोपाठ १ जुलै १९४६ ला रथयात्रेच्या दरम्यान झालेल्या पोलीस गोळीबारानंतर दंगली उसळल्या आणि सचारबंदी लागू करण्यात आली. अधिकृत माहितीनुसार शेर कोटडा पोलीस ठाण्याजवळ दुपारी १२.३० वाजता दंगल सुरू झाली. रथयात्रेनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत हिंदू आखाड्यातील पहिलवान विविध कसरती करून दाखवत होते. एका मुस्लिम आखाड्यातील नामवंत कसरतपटू सिकंदर आणि त्याचे आखाड्यातील तीन-चार सहकारी मिरवणुकीतील कसरती पाहत होते. त्या कसरतींदरम्यान चित्तरंजन चिंतामणी ज्या पद्धतीने वजन उचलत होता, त्यावर सिकंदरने टीका केली. त्या दोघांच्यात झालेाल्या बाचाबाचीत सिकंदर आणि चिंतामणी हे दोघेही जखमी झाले. या प्रकरणी सिकंदर आणि काही साधूंना अटक करून पोलीस लॉक अपमध्ये ठेवण्यात आले. यामुळे दंगली सुरू झाल्या.
त्यानंतर १९५८ मध्ये (अहमदाबादमधील) खाडिया मध्ये दंगल झाली आणि पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यावेळच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटने १२ ऑगस्टला झालेल्या या गोळीबाराबद्दल बोलताना सांगितले की, ‘‘खाडिया हा अहमदाबादमधील वॉर्ड दंगलींमध्ये सर्वाधिक प्रभावीत झाला आहे. यापूवीच्या प्रत्येक दंगलीत हाच सर्वाधिक प्रभावीत होता.’’ सांप्रदायिक दंगली म्हटल्या की त्या हिंदु-मुस्लिम यांच्यातच झाल्यात, असे मात्र नाही. १९६५ मध्ये शहरातील पहिल्या शीख मुस्लिम दंगली पाहण्यास मिळाल्या, ज्या काही मुस्लिमांनी दोन शीख रिक्षाचालकांची हत्या केल्यामुळे झाल्यात. दुसर्या दिवशी अत्यंयात्रेच्या वेळी संतप्त झालेल्या शिखांनी मुस्लिम दुकानांवर हल्ले चढविले.
१९६९ च्या दंगली हा तर स्वंतत्र इतिहासच आहे. अहवाल म्हणतो- ‘सप्टेंबर १९६९ सारख्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरील दंगली गुजरातमध्ये यापूर्वी कधीच झाल्या नव्हत्या. या दंगलीत दोन्ही समाजांची प्रचंड मोठी मनुष्यहानी तर झालीच, पण वित्तहानीही झाली.’ या दंगलींची चौकशी करणार्या रेड्डी आयोगाच्या म्हणण्यानुसार या दंगलीत किमान ५६० लोक मृत्युमुखी पडले, तर ५६१ लोक जखमी झाले. १८ सप्टेंबर १९६९ ला बुखारी साहेब छैलाचा उरुस सुरू असताना तेथे मोठी गर्दी जमली होती आणि क्षुल्लक कारणावरून दंगली उसळल्या. दुपारी ३.४५ वाजता मंदिरातील साधू आपल्या गायी घेऊन मंदिराच्या दाराजवळ पोचले. तेवढ्यात कोणीतरी ‘या गायींमुळे आमच्या उरुसात विघ्न आले,’ असा आक्षेप घेतला. मुसलमान आणि साधूंच्या बाचाबाचीत काही साधू जखमी झाले. त्यानंतर शहराच्या वेगवेगळ्या भागात हिंसाचार वेगाने पसरला. त्यात मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झालीच पण त्याबरोबर वित्तहानीही झाली. १९८५ च्या आरक्षणविरोधी आंदोलनाने सांप्रदायिक रूप घेतले आणि दंगली सुरू झाल्या. १९९२ मध्ये बाबरी मशीद उद्ध्वस्त होताच मोठ्या दंगलींना सुरुवात झाली.’’
(संदर्भ: http://timesofindia.indiatimes.com/articleshow/6611833.cms)
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या या लेखातून सत्य बाहेर आले आहे. या सर्व दंगली गोधरासारखी कोणतीही मोठी घटना घडली नसताना झाल्या. १९६९ च्या दंगलीत संचारबंदी सलग ६५ दिवस होती! तर २००२ मध्ये कारसेवकांना अत्यंत क्रूरपणे जाळून मारलेले असतानाही दंगली त्या तुलनेने कमी झाल्या. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ हे वृत्तपत्र मुस्लिमविरोधी असल्याचा आरोप कोणीही करू शकत नाही.
कट्टर भाजपाविरोधी म्हणून ओळखले जाणारे व्ही. गंगाधर यांनी ऑगस्ट १९९९ मध्ये लिहिलेल्या एका लेखात म्हटले-
‘‘१९४१ च्या (अहमदाबादच्या) सांप्रदायिक दंगलींमध्ये हिंदूंनी जबरदस्त मार खाल्ला आणि तो ते कधीच विसरले नाहीत. अहमदाबादमधील खाडिया हा भाग हिंदूंबहुल असला, तरी लढाऊपणासाठी ओळखला जात नव्हता. १९४५ मधील सांप्रदायिक दंगली तुलनेने कमी तीव्रतेच्या होत्या…
१९६९ हे या सांप्रदायिक तणावाचे चित्र बदलून टाकणारे वर्ष ठरले. या वर्षीच्या दंगलीत ५ हजारांहून अधिक लोक मृत झाले आणि अहमदाबाद हे मोठ्या हत्याकांडाचे शहर बनले. केंद्रातील इंदिरा गांधी यांचे कॉंग्रेस सरकार आणि राज्यातील हितेंद्र देसाई यांचे संघटना कॉंग्रेेसचे सरकार यांच्यात निर्माण झालेल्या तणावातून १९६९ च्या दंगली आणखीनच पेटल्या…
…शहराच्या इतिहासात प्रथमच दंगलींचा फटका कामगार वस्त्यांना बसला. इथल्या हत्या अत्यंत क्रूर होत्या. त्यानंतर गुजरात पूर्वीसारखा राहिला नाही.’’
(Source: http://m.rediff.com/news/1999/aug/06abd.htm)
व्ही. गंगाधर हे कट्टर भाजपाविरोधी आहेत. पण त्यांच्या लेखामुळे गुजरातच्या रक्तरंजित इतिहासातील काही मुद्दे समजण्यास मदत होते. १९८२ मधील दंगलीचा विस्तार अहमदाबाद आणि गोधराबरोबरच बडोद्यातही झाला होता. ‘आय.पी.सी.एस. रिसर्च पेपर्स’ म्हणून ओळखल्या जाणार्या संशोधन अहवालाच्या तिसर्या खंडात मार्च २००४ मध्ये बी.राजेश्वरी यांनी लिहिले-
‘‘एप्रिल आणि डिसेंबर १९९० या काळात गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात दंगली झाल्या. यात हिंसाचाराच्या १४०० वर घटना घडल्या. त्यामध्ये अधिकृतपणे २२४ लोकांचा मृत्यू झाला, तर ७७५ लोक जखमी झाले. पाठोपाठ १९९१ च्या जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात दंगलीच्या १२० घटना घडल्या. त्यात अधिकृत आकड्यानुसार ३८ लोक मृत्युमुखी पडले तर १७० लोक जखमी झाले. ऑक्टोबर १९९० मध्ये लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेच्या काळात अहमदाबादमध्ये झालेल्या दंगलीत अधिकृतपणे ४१ लोक ठार झालेत. बडोद्यामध्ये एप्रिल ते जुलै १९९१ या काळात दंगली झाल्या. एका रिक्षावाल्याने एका मुलाला ठोकल्यच्या क्षुल्लक घटनेमुळे या दंगली भडकल्या. अयोध्येतील वादग्रस्त मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर १९९२ मध्ये सुरतमध्ये झालेल्या दंगलीत २०० लोक ठार झाले.’’
या लेखाच्या लेखिका बी. राजेश्वरी या दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्राध्यापक आहेत. ठाम संघ-भाजपा विरोधी असल्या तरी त्यांनी दिलेली माहिती महत्त्वाची आहे. वर सांगितलेल्या विविध घटना गुजरातच्या हिंसाचाराचा रक्तरंजित इतिहास समजून घेण्यास पुरेशा आहेत. इंग्रजी दैनिकांच्या संपादकीय पानांवर संपादक आणि मुक्त पत्रकारांनी जे धादांत खोटे आरोप केले, ते घृणास्पद आहेत. ‘‘स्वतंत्र भारतातील सर्वात मोठ्या मुस्लिम हत्याकांडाला नरेंद्र मोदीच जबाबदार’’ किंवा “गुजरातमध्ये मोंदीनी २००० मुस्लिमांना ठार मारले,’’ अशा शीर्षकांतून धादांत असत्य सांगितले गेले. या लेखकांना गुजरातमधील दंगलींचा इतिहास माहीत होता. या पुस्तकात आतापर्यंत दिलेले सर्व संदर्भ याच लोकांच्या लेखनातील आहेत आणि तरीही हे लोक आता धादांत असत्य लिहितात.
काही वृत्तपत्रांचे संपादक ऐतिहासिक सत्याकडे डोळेझाक करतात. मध्ययुगीन काळात परकीय मुस्लिम राज्यकर्त्यांकडून हिंदूंवर झालेल्या अत्याचारांकडे विशेषत: इ.स. १२९८ पासून गुजरातमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचारांकडे ते डोळेझाक करीत आहेत. एवढेच नव्हे, तर १९४० च्या दशकातील गुजरातच्या सांप्रदायिक हिंसाचाराकडे व त्यातील हिंदूंच्या यातनांकडे ते लक्ष देण्यास तयार नाहीत. तिमूर या मुस्लिम आक्रमकाने १३९९ मध्ये एका दिवसात १ लाख हिंदूंची हत्या केली. प्रा. के. एस. लाल यांचे मत की इ.स. १००० ते १५२५ या काळात हिंदूंची लोकसंख्या ८ कोटींनी कमी झाली आपण पहिल्या प्रकरणात पाहिले. सर्वाधिक धर्मांध असलेला मोगल सम्राट औरंगजेब (१६१७-१७०७, १६५८ ते १७०७ या काळात सत्तेवर होता) याचे जन्मस्थान म्हणून गोधरा आणि त्याचे जुळे शहर दाहोड ओळखले जाते. त्याबरोबरच हे शहर नेहमी हिंसाचारासाठी ओळखले जाते. गोधरातील खूप लोकांचा संपर्क पाकिस्तानमधील हिंसाचारग्रस्त कराची या शहराशी असल्याचे Rediff.com ने २ मार्च २००५ च्या लेखात म्हटले आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नेही हेच ३० मे २००२ ला म्हटले.
‘फ्रंटलाइन’ सारख्या कट्टर भाजपाविरोधी पाक्षिकानेही म्हटले आहे – ‘‘अहमदाबादमधील रथयात्रा नेहमीच सांप्रदायिक हिंसाचाराचे निमित्त ठरली आहे. १९६९ मधील सर्वात भयंकर हत्याकांडही त्यातूनच सुरू झाले.’’ (फ्रंटलाइन १३ ते २६ मार्च २००४)
याच पाक्षिकाने ‘द हिंदुत्व एक्स्पेरिमेंट’ (लेखिका- डोनी बुन्शा) या लेखात म्हटले आहे- ‘‘सर्वांत पहिली दंगल १७१४ मध्ये मोगल सत्तेत असताना अहमदाबादमध्ये झाली. एका क्षुल्लक घटनेतून ती सुरू झाली. घटना होती चुकुन गुलाल उडविण्याची. १९८५ च्या दंगलीची चौकशी करणार्या व्ही.एस.दवे आयोगाने या घटनेचा उल्लेख केला आहे. त्यानंतरच्या मराठा सत्ताकाळातही अनेक दंगली झाल्यात. मराठा सत्ता १८१७ पर्यंत चालू राहिली. ब्रिटिश कालखंडात १९४१ मध्ये झालेल्या दंगलींमुळे असहकाराची चळवळ स्थगित करावी लागली. त्याचा परिणाम म्हणून अहमदाबदामधील मुस्लिम ‘मुस्लिम लीग’कडे वळण्यास सुरुवात झाली. १९४६ मध्ये शहरात पुन्हा दंगल झाली. स्वातंत्र्यानंतर अहमदाबादमध्ये १९५८, १९६५, १९६९ मध्ये दंगली झाल्या. १९६९ मधील दंगलीही क्षुल्लक कारणावरून सुरू झाल्या. पण त्या गुजरातमधील सर्वाधिक रक्तरंजित दंगलींपैकी ठरल्या.’’ (फ्रंटलाइन ११-२४ मे २००२)
कट्टर भाजपाविरोधी, कम्युनिस्ट असलेल्या ‘फ्रंटलाइन’ पाक्षिकानेही हे मान्य केले की, कॉंग्रेसच्या सत्ताकाळातील १९६९ च्या दंगली सर्वांत भयानक होत्या, आणि तेवढ्या नरेंद्र मोदी काळातील २००२ च्या दंगली नव्हत्या.
‘द पायोनियर’ या दैनिकात २० एप्रिल २००२ ला प्रसिद्ध झालेला राकेश सिन्हा यांचा लेख असा होता-
‘‘श्वानाला दोषी ठरवा आणि फाशी द्या
‘‘गुजरात पहिल्यांदाच धार्मिक दंगलींना सामोरा जात आहे असे नाही. गुजरातचा संपूर्ण इतिहासच धार्मिक तणाव आणि संघर्षाने भरलेला आहे.
स्वातंत्र्यानंतर गुजरातमध्ये सप्टेंबर १९६९ मध्ये सर्वांत भयंकर दंगल झाली. दंगलीचे कारण, जगन्नाथ मंदिराच्या दोन साधूंवर १००० मुस्लिमांच्या जमावाने केलेला हल्ला, हे होते. १८ सप्टेंबर १९६९ ला उरुस साजरा करण्यासाठी हे मुस्लिम जमले होते. यातून अहमदाबादमध्ये आणि बडोद्यासह इतर भागात संघटित हिंसाचार सुरू झाला. या दंगलीत ६००० कुटुंबे बेघर झाली व आपली घरे,संपत्ती व सामान गमावून बसली. यावरून ही दंगल किती मोठी असेल याचा अंदाज येऊ शकतो. सांप्रदायिकताविरोधी समितीने या दंगलीबाबत दिलेल्या ‘गुजरातस रॉयट एक्सरेड’ या अहवालात मृतांची संख्या ३ हजार दिली.
दंगलकाळात ‘धार्मिक भूकंप’ पाहण्यास मिळाला…१९६९ मध्ये संपूर्ण दंगल काळात (१ महिना) माध्यमांनी संयम दाखविला. त्यामुळे त्या दंगलींचे रूपांतर राजकीय लढाईत किंवा सत्ताधारी कॉंेग्रेस विरोधात किंवा मुख्यमंत्री हितेंद्र देसाई यांच्या विरोधात झाले नाही. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ सप्टेंबरला अल्पकालीन भेट दिली. त्याच्या आधी आणि नंतरही हिंसाचार सुरूच राहिला. त्याच दिवशी अहमदाबादजवळ जनता एक्स्प्रेसमध्ये १७ प्रवाशांची हत्या करण्यात आली. पण या भयानक घटनेनंतर पंतप्रधान पदाच्या प्रतिष्ठेला किंवा उंचीला कोणीही आव्हान दिले नाही.
१९६९ च्या दंगलीत ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या बातमीत म्हटले आहे, ‘‘दंगेखोरांनी साबरमती हरिजन आश्रमालाही सोडले नाही.” त्यांनी आश्रमवासियांवर हल्ला केला आणि आश्रमाची नासधूस केली.” (संदर्भ: www.hindunet.org/hvk/articles/0402/171.htm)
‘द टाइम्स ऑफ इंडिया’ला गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेली मुलाखत ३० मार्च २००२ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. ती अशी-
“प्रश्न – गोधरामध्ये साबरमती एक्स्प्रेसमधील ५८ कारसेवकांना जाळण्याची घटना आपल्या दृष्टीने पूर्वनियोजित होती का उत्स्फूर्त होती? या हल्ल्याला प्रवृत्त करणारी एखादी अनुचित घटना प्लॅटफॉर्मवर घडली होती का?
उत्तर – साबरमती एक्स्प्रेसमधील ५८ निष्पाप कारसेवकांना कंपार्टमेंटमध्ये ज्या पद्धतीने जिवंत जाळून मारण्यात आले, ते पाहता हे मोठे कारस्थान होते. पूर्वनियोजित आणि निर्घृण (cold blooded) केलेला हा हल्ला होता. रेल्वे गोध्र्याला ७ वाजून ४३ मिनिटांनी आली आणि ५ मिनिटात म्हणजे ७ वाजून ४८ मिनिटांनी तिने गोधरा सोडले. अवघ्या ५०० मीटरवर सिग्नल फालिया येथे गाडी थांबविण्यात आली आणि जमावाने एकत्रितपणे हल्ला चढवला. असा हल्ला उत्स्फूर्त कसा असू शकतो? ही गाडी फैजाबादहून निघून ३६ तासांनी गोधराला पोचली. त्या संपूर्ण प्रवासात कारसेवकांनी काही वेडेवाकडे वर्तन केल्याची तक्रार नाही. पण गुजरात कॉंग्रेेसचे प्रदेशाध्यक्ष अमरसिंह चौधरी यांनी टीव्हीवरील आपल्या मुलाखतीत आरोप केला की कारसेवकांनी चहाचे पैसे दिले नाहीत, म्हणून ही घटना घडली. एवढी भीषण घटना योग्य ठरविणे अत्यंत हास्यास्पद (ridiculous) नाही का?
प्रश्न – देवबंदच्या इस्लामी प्रणालीला मानणार्या तबलीगी जमीयत संघटनेकडून गोधरामध्ये धर्मांधता पसरविला जात असल्याच्या बातम्या येत आहेत आणि बहुसंख्य समाजातील काही व्यक्तींना, गेल्या काही वर्षात जिवंत जाळल्या गेल्याचे म्हटले जाते. या बातम्या खर्या आहेत का? या खर्या असतील, तर त्या कोणत्या तारखेला घडल्या, त्यात कोणाला जाळले गेले आणि संबंधित व्यक्तींवर कोणती कारवाई झाली?
उत्तर – गोध्र्यातील रक्तरंजित जातीय इतिहास, ही गोष्ट लपून राहिलेली नाही. पण गेल्या २५-३० वर्षांत घटनांनी गंभीर आणि विकृत रूप घेतले आहे. याच भागात एका भयंकर प्रसंगात दोन कुटुंबाना जिवंत जाळण्यात आले होते. आणि १० वर्षांपूर्वी २ महिला शिक्षिकांसह, ४ शिक्षकांना शाळेत विद्यार्थ्यांसमोर तुकडे-तुकडे करून अत्यंत क्रूरपणे मारण्यात आले.
त्या वेळच्या कॉंग्रेेस सरकारने नेहमीच्या पद्धतीने न्यायालयात खटले दाखल केले, पण खर्या गुन्हेगारांना शिक्षा करण्यात ते फार अपयशी ठरले. एवढंच नाही, या प्रकरणातला मुख्य दोषी अश्रफ याला त्याच्याच सहआरोपींनी तुरुंगात ठार मारले. आणि हे सर्व प्रकरण नेहमीसाठी बाजूला पाडले.
प्रश्न – अहमदाबादमधील हिंसाचाराच्या ज्या बातम्या येत आहेत, त्यावरून तो संघटित असल्याचे दिसते. सशस्त्र जमाव हातात मतदारयाद्या घेऊन मुस्लिमांवर हल्ला चढवत होते अशा बातम्या आहेत. हर्ष मंदर या आय ए एस अधिकार्याने अहमदाबादमधील हिंसाचाराची गोठवून टाकणारी माहिती दिली आहे. प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण का ठेवू शकले नाही? पोलीसही निष्पक्ष नव्हते असा आरोप आहे. यावर आपले म्हणणे काय आहे?
उत्तर– गुजरातसंबंधी ज्यांना माहिती आहे, त्यांना हे माहीत आहे की राज्य सांप्रदायिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. इथे पतंग उडविणे किंवा क्रिकेट सामने यासारख्या क्षुल्लक कारणांवरूनही भयंकर स्वरूपाच्या दंगली झाल्या आहेत. पूर्वीच्या प्रसंगांत एकाच वेळी २०० ठिकाणी हिंसाचार उसळला होता आणि ३०० पेक्षा जास्त गावांत, शहरांत अनेक महिने संचारबंदी लागू होती. याच्याशी तुलना करता, गोधरा हत्याकांडासारखी घटना इतिहासात कधीच घडली नव्हती. पण तरीही आम्ही तातडीने हालचाली केल्यामुळे हिंसाचार फक्त ७२ तासात आटोक्यात आणू शकलो. पोलिसांनी सुरुवातीलाच (पहिल्या ३ दिवसात) गोळीबाराच्या ३९०० फैरी झाडल्या. सीमावर्ती भागातून लष्कराला हलवून विमानाने अहमदाबादला आणले गेले आणि अवघ्या १६ तासात ते दंगलग्रस्त भागात तैनात झाले. सरकार किंवा पोलिसांकडून कोणतीही दिरंगाई झाली नाही…”
विचार करा, एक राज्य ज्यात एकाच वेळी २०० ठिकाणी दंगली होतात आणि ३०० शहरे आणि गावांमध्ये अनेक महिने लागोपाठ संचारबंदी चालू राहते! १९८० मध्ये तर गोधरा शहरातील संचारबंदी सलग वर्षभर लागू होती. त्या तुलनेत २००२ चा हिंसाचार फार कमी होता.
पण हे सर्व माहीत असूनही माध्यमांतील काही लोकांना ते माहीत असल्याचे दाखवायची इच्छा नाही. एक माणूस- नरेंद्र मोदी, आणि एक पक्ष- भाजपा यांना लक्ष्य करण्यातच त्यांनी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. गुजरात सरकारने हिंसाचार थांबविण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे कौतुक करण्याऐवजी माध्यमांतील या लोकांनी अत्यंत बेजाबबदारपणे दंगलींकडे डोळेझाक केल्याचा आरोप भाजपा सरकारवर केला आहे. ज्याला सत्य बघायचेच नाही, त्याला ते दिसत नाही. या शहामृगी भूमिकेमागची कारणे काय आहेत ती आपण पुढील एका प्रकरणांत पाहू.
Leave A Comment