‘गोधरा’नंतरच्या दंगलींबद्दल नरेंद्र मोदींनी कधीच दु:ख व्यक्त केले नाही

सत्य – आश्चर्य हे आहे, की माध्यमांतील किती मोठा गट किती मोठ्या प्रमाणाच्या असत्य गोष्टी प्रसिद्ध करतो आणि त्यालाच धरून राहतो. मग या आपल्याच असत्यावर तेच विश्वास ठेवायला लागतात. गुजरात दंगलींबद्दल नरेंद्र मोदींनी डिसेंबर २०१३ पर्यंत कधीच खेद व्यक्त केला नाही, हा पुन्हा पुन्हा केला जाणारा दावा असाच असत्य आणि चुकीचा आहे.

 

   नरेंद्र मोदींनी या दंगलींबद्दल खेद व्यक्त केला होता व त्यांना दुर्दैवी म्हटले होते. ‘आज तक’ वृत्तवाहिनीच्या ‘सीधी बात’ या कार्यक्रमात प्रभू चावला यांनी मोदींची मुलाखत घेतली होती. त्यातील सारांश ‘इंडिया टुडे’ने ४ नोव्हेंबर २००२ च्या अंकात प्रसिद्ध केला. या मुलाखतीत नरेंद्र मोदींना विचारले होते, ‘‘पंतप्रधान वाजपेयी आणि गृहमंत्री अडवाणी यांनी असे म्हटले आहे की, गुजरातमध्ये जे काही घडले, ते चुकीचे आहे.’’ यावर मोदी उत्तरले, ‘‘मीही तेच म्हणतो आहे. गुजरातमधील सांप्रदायिक दंगली दुर्दैवी होत्या आणि त्या झाल्यात, याचे आम्हाला दु:ख वाटते.’’ (संदर्भ : http://indiatoday.intoday.in/story/communal-riots-in-gujarat-were-unfortunate-narendra-modi/1/218781.html

 

   गुजरातमधील २००२ च्या दंगलींनंतर नरेंद्र मोदी यांनी मार्च २००२ मध्ये गुजरात विधानसभेत एक निवेदन केले होते, त्यामधील एक परिच्छेद असा: “यावर आपण आत्मशोध घेणे अपेक्षित नाही का? गोधरातील घटना असो किंवा ‘गोधरा’नंतरच्या दंगली असो, यामुळे कोणत्याही सभ्य समाजाची प्रतिष्ठा वाढत नाही. दंगली या मानवतेवरील कलंकच आहे. त्यामुळे कोणाचीही मान उंच राहू शकत नाही. मग असे असताना त्याबद्दल मतमतांतरे (difference of opinion) कशासाठी?” 

 

   नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०११ मध्ये सद्भावना उपोषण केले, त्यावेळी काही वृत्तपत्रांनी वृत्त दिले: “राज्यातील कोणाच्याही वेदना या त्यांच्या वेदना आहेत आणि प्रत्येकाला न्याय िमळवून देणे, ही त्यांची जबाबदारी आहे, असे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१६ सप्टेंबर २०११ ला) म्हटले. २००२ च्या ‘गोधरा’नंतरच्या दंगलींबद्दल दु:ख व्यक्त करणारे त्यांचे हे पहिले विधान आहे, असा या वाक्याचा निष्कर्ष काढला जातो आहे. ‘‘आमच्या दृष्टीने भारताची राज्यघटना सर्वोच्च आहे. राज्याचा मुख्यमंत्री म्हणून कोणाचेही दु:ख हे माझे दु:ख आहे आणि प्रत्येकाला न्याय िमळवून देणे, ही राज्याची (माझ्या सरकारची) जबाबदारी आहे.’’ ३ दिवसांच्या उपोषणाला बसण्याच्या एका रात्री आधी मोदींनी हे सांगितले.” 

 

   http://www.dnaindia.com/india/report-narendra-modi-s-first-sign-of-regret-says-pain-of-anybody-in-state-is-my-pain-1588032 

 

   केवळ ‘डी.एन.ए.’ या वृत्तपत्रानेच नव्हे, तर जवळपास सर्वच माध्यमांनी असेच म्हटले. मोदींच्या सप्टेंबर २०११ च्या या विधानाला, ‘दु:ख व्यक्त करण्याचा पहिला प्रसंग’ (म्हणजे जसेकी त्या आधी मोदींनी दंगलींचा निषेध कधी केलाच नाही) असा निष्कर्ष काढणे हास्यास्पद तर आहेच, पण ते निराधार असत्यही आहे. २०११ च्या या उपोषणापूर्वी त्यांनी अनेकवेळा या दंगलींचा थेट निषेध केला होता. पण स्वयंघोषित धर्मनिरपेक्षतावादी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी मोदीविरोधी विद्वेष भडकविणारे अभियान चालू ठेवून या कल्पित कथेला वारंवार पसरविले की मोदींनी कधी दंगलींचा निषेध केला नाही. कॉंग्रेसच्या नेत्यांनीही हेच पुन्हा पुन्हा सांगितले. 

 

   गुजरात दंगलींसाठी नरेंद्र मोदींनी कधीही माफी मागितली नाही, हे खरे आहे आणि ते योग्यही आहे. एखादी व्यक्ती चूक करते, त्यावेळी ती माफी मागत असते. नरेंद्र मोदींनी कोणती चूक केली? प्रत्यक्षात २००२ च्या दंगली नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. माध्यमांचे अनेकदा म्हणणे होते, ‘‘१९८४ च्या दंगलींसाठी कॉंग्रेसने माफी मागितली आहे. २००२ च्या गुजरात दंगलींसाठी भाजपा माफी मागेल का?” २००९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव झाल्यानंतर भाजपा नेते नलिन कोहली यांना १६ मे २००९ च्या एका टी.व्ही. कार्यक्रमात हा प्रश्न विचारण्यात आला होता.

 

   १९८४ च्या दंगली आणि २००२ मधील गोधरानंतरच्या दंगली, यात समांतर अशी एकही गोष्ट नाही. या दोन्हीमध्ये असलेले फरक आपण पुढील प्रकरणात पाहणारच आहोत. दुसरे म्हणजे त्या दंगलींबद्दल कॉंग्रेसने माफी मागणे, ही काही कौतुकाची गोष्ट नाही. माफी मागणे याचा अर्थ, १९८४ च्या दंगलीत ३ हजार शीख मारले गेले, त्याला जबाबदार असल्याचे मान्य करणे. केवळ माफी मागून दिल्याने ३ हजार लोकांच्या हत्येचे पाप धुतले जाणार आहे का? दोषी लोकांना जबरदस्त शिक्षाच व्हाला हवी. त्यावेळच्या कॉंग्रेस सरकारने दंगलखोरांविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही आणि फार कमी लोकांना अटक झाली. सी.एन.एन.-आय.बी.एन. आणि एन.डी.टी.व्ही. या वाहिन्यांच्या म्हणण्यानुसार १२ प्रकरणांमध्ये केवळ ३० लोक दोषी ठरले आहेत (एप्रिल २०१३ पर्यंत). सी.एन.एन.-आय.बी.एन.ने दोषी ठरलेल्या निकालांची यादी जाहीर कराला हवी,ज्याने सत्य स्पष्ट होईल, जसे आम्ही गुजरात २००२ दंगलींबद्द्ल या पुस्तकात पुढील एका प्रकरणात दिली आहे. नोव्हेंबर २०१४ मध्ये राइट टु इंफोर्मेशन अ‍ॅक्ट खाली दिलेल्या उत्तरत म्हटले की ७ प्रकरणात २७ लोकांना दोषी घोषित करण्यात आले आहे. http://timesofindia.indiatimes.com/city/delhi/1984-riots-Accused-in-7-of-255-cases-convicted/articleshow/45017369.cms

 

     कॉंग्रेसचे नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी १९९९ मध्ये दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढविताना आरोप केला होता की, १९८४ च्या दंगली रा.स्व. संघाने घडविल्या. या हास्यास्पद आरोपाबद्दल त्यांनी संघाची किंवा इतर कोणाचीही माफी अद्याप मागितलेली नाही. या विचित्र आरोपामुळे मनमोहन सिंग यांना दक्षिण दिल्ली मतदारसंघातून भाजपाच्या विजयकुमार मल्होत्रा यांच्या हस्ते पराभव पत्करावा लागला. (संदर्भ : http://www.rediff.com/election/1999/sep/02man.htm)

कल्पित कथा