विहिंप सारख्या संघपरिवारातील संघटनांनी दंगलींचे आयोजन केले

सत्य- २००२ मध्ये दंगली झाल्या तेव्हा गुजरातच्या १८,६०० गावांपैकी १०,००० गावांमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या शाखा होत्या. त्यांची इच्छा असती तर या १०,००० पैकी अनेक गावांत त्यांना प्रतिक्रियात्मक दंगली सहज घडविता आल्या असत्या. प्रत्यक्षात राज्यातील १८,६०० गावांपैकी फक्त ५० गावांमध्ये दंगली झाल्या. त्यावेळचे विहिंपचे अंतरराष्ट्रीय सरचिटणीस (आणि आता कार्याध्यक्ष) प्रवीण तोगडिया हे पटेल आहेत आणि केशुभाई पटेल यांच्याप्रमाणेच गुजरातच्या सौराष्ट्र भागातले आहेत. असे असूनही सौराष्ट्रात दंगली झाल्याच नाहीत!  

 

   याउलट २८ फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये ज्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर दंगली उसळल्या, त्या विहिंप किंवा संघपरिवारातील कोणतीही संघटना करु शकल्या नसत्या. गोधरा हत्याकांडाची ती उत्स्फूर्त सामाजिक प्रतिक्रिया होती. ज्येष्ठ राजकीय विश्‍लेषक अरविंद बोस्मिया यांनीही हेच म्हटले.

   

   काहीजण असे विचारतात, ‘‘एकीकडे तुम्ही असे म्हणता की काहीच घडले नाही. जेमतेम ४०-५० गावात दंगली झाल्यात. दुसरीकडे तुम्ही म्हणता की दंगली एवढ्या मोठ्या होत्या, की त्या कोणी संघटना एकट्याने  करण्याची शक्यता नाही.’’

 

   या दोन्ही गोष्टी एकाच वेळी खरया आहेत. २८ फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये नरोडा पाटिया भागात मुस्लिमांवर हल्ला करण्यासाठी १७ हजार लोकांचे जमाव एकत्र झाले होते, असे त्या भागातील पोलीस निरीक्षक के.के. मैसोरवाला यांनी म्हटले. ‘इंडिया टुडे’नेही १८ मार्च २००२ च्या अंकात दिलेल्या बातमीत असे म्हटले की, किमान ४ ते ५ हजार लोकांचे किमान ३ जमाव नरोडा पाटियावर चालून गेले. त्यामध्ये चारा जमातीचा समावेश होता. अहमदाबादमध्ये २८ फेब्रुवारीला एक क्षण असा आला की किमान २५ हजार लोक एकाच वेळी विविध मुस्लिम वस्त्यांवर चालून गेले होते. जलद कृती दल आणि सी.आर.पी.एफ.चे जवान हा हिंसाचार नियंत्रित करू शकले नाहीत. ‘द हिंदू’नेही दुसरया दिवशी आपल्या बातमीत म्हटले की परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे वाटत होते. अहमदाबाद पोलिसांना एरवी सरासरी २०० दूरध्वनी यायचे, त्या दिवशी ही संख्या ३,५०० हून अधिक होती. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने त्याचे वर्णन करताना म्हटले आहे की, ‘पोलिसांची उपस्थिती हिंसाचाराच्या महासागरातील एका बिंदूसारखी होती.’ त्यावेळी संपूर्ण पोलीस दल तैनात असतानाही ही स्थिती होती. अहमदाबाद फायर ब्रिगेडला, जिला १०० ठिकाणी पोचण्याची क्षमता होती, २८ फेब्रुवारीला अहमदाबादला ४०० कॉल आले. अहमदाबादमध्ये केवळ २४ तासात एवढे मोठे जमाव जमविणे संघपरिवाराच्या किंवा इतर कोणत्याही संघटनेच्या आवाक्याबाहेरचे काम होते.

 

   पण, गुजरातमध्ये २८ फेब्रुवारीला किंवा त्यानंतर, विहिंपच्या शाखा ज्या १०,००० गावांत चालू होत्या, तेथे विहिंप सहजपणे दंगली घडवू शकली असती, जर घडवायची इच्छा असती.

 

   २७ फेब्रुवारीला गोधरा हत्याकांड घडले. त्याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक निवेदन प्रसिद्ध केले. त्यात म्हटले होते, ‘‘संघ या हत्याकांडाचा निषेध करतो आणि संयम बाळगण्याचे आवाहन करतो.’’ ‘हिंदू’ या दैनिकानेही २८ फेब्रुवारीच्या अंकात ही बातमी दिली असून त्यात म्हटले, ‘(२७ फेब्रुवारीला) लोकांना संयम बाळगण्याचे आवाहन रा.स्व.संघाने केले आहे.’ या आवाहनाची स्कॅन केलेली कॉपी आपण दुसरया प्रकरणात पाहिली आहे. १० मार्च २००२ च्या ‘ऑर्गनायझर’च्या अंकात संघाचे तत्कालीन सरकार्यवाह मोहन भागवत यांनी २७ फेब्रुवारीला केलेले आवाहनही आपण पाहिले आहे. ‘टेलिग्राफ’(कोलकाता) ने आपल्या २८ फेब्रुवारी २००२ च्या अंकात म्हटले, “पंतप्रधानांच्या पाठीमागे रा.स्व.संघ ठामपणे उभा राहिला, संयमाचे आवाहन करुन. सहसरर्कावाह मदनदास देवी म्हणाले, ‘हिंदू समाजाच्या सहिष्णुतेच्या कसोटीची ही वेळ आहे. लोकांनी कायदा आपल्या हातात घेण्याऐवजी गंभीर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारशी सहकार्य करावे.’’’

(संदर्भ: http://www.telegraphindia.com/1020228/frontpa.htm#head1)

 

   रेडिफ डॉट कॉमने वृत्तसंस्थांचा हवाला देत २ मार्च २००२ ला दिलेले वृत्त असे आहे –

 

‘‘संघ, विहिंप कडून गुजरातमध्ये शांततेचे आवाहन

   गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलींनंतर संघ आणि विहिंपने शनिवारी (२ मार्च २००२ ला) आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले की, देशातील शांतता ढळेल अशी कोणतीही कृती टाळा आणि आशा व्यक्त केली की शहाणपण नांदेल.

   संघाचे सरकार्यवाह मोहन भागवत यांनी दिल्लीमध्ये प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की: “हिंदुत्वावर विश्वास असणारया संघस्वयंसेवक, सहानुभूतीदार आणि िमत्रांना मी आवाहन करतो की घोषणाबाजी, दगडफेक यासारख्या शांतता भंग करणारया कोणत्याही गोष्टींपासून दूर रहा, सध्याच्या देशातील नाजूक परिस्थितीला लक्षात घेऊन, कारण त्यामुळे राष्ट्रविरोधी आणि अतिरेकी शक्तींनाच बळ मिळेल. इतर धर्मीयांनाही त्यांनी आवाहन केले की ‘अतिरेक्यांच्या चिथावणीला बळी पडू नका आणि आपल्या हिंदू बांधवांप्रमाणे आपणही भारतमातेची लेकरे आहेात, हे समजून वागा.’

   दरम्यान, विहिंपनेही ‘गुजरातमधील सध्याचा हिंसाचार थांबवा’ असे आवाहन करताना म्हटले आहे, ‘कोणाही विरुद्धचा कोणत्याही प्रकारचा हिंसाचार चिंताजनक आहे.’ नवी दिल्लीमध्ये बातमीदारांशी बोलताना विहिंपचे प्रवक्ते वीरेश्‍वर द्विवेदी म्हणाले, ‘गोधरातील घटना आणि नंतरचा हिंसाचार अत्यंत दुर्दैवी आहे, कोणाही विरुद्धचा कोणत्याही प्रकारचा हिंसाचार चिंताजनक आहे.’

   ‘गुजरातमधील चालू असलेले हत्याकांड थांबवा’ असे आवाहन करून ते म्हणाले, ‘लवकरच सर्वांना सदबुद्धी होईल अशी आशा आहे.’ दंगलीत मारले गेलेल्यांबद्दल दु:ख व्यक्त करून द्विवेदी यांनी राज्यातील हिंसाचाराला बळी पडलेल्यांबद्दल सहानुभूती व्यक्त केली. पण विरोधी पक्षांनी आता परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गुजरातमध्ये शिष्टमंडळ पाठविण्याचे ठरविले आहे, पण गोधरा हत्याकांडानंतर त्यांना असे करायचे सुचले नाही, याबद्दल खेद व्यक्त करून ते म्हणाले, ‘हे सर्व मतपेटी डोळ्यासमोर ठेवून केले जात आहे’.- वृत्तसंस्था.’’

(संदर्भ : http://www.rediff.com/news/2002/mar/02train10.htm )

 

   मोहन भागवत यांचे निवेदन २७ फेब्रुवारीलाच प्रसिद्ध झाले होते आणि ते ‘ऑर्गनायझर’ साप्ताहिकाच्या १० मार्च २००२ च्या अंकात (२७ फेब्रुवारीपर्यंतच्या घटनांच्या बातम्या देणारे) छापले गेले होते. विहिंपनेही शांततेसाठी आवाहन केले. कोणतीही मोठी दंगल सुरू व्हायच्या आधी २८ फेब्रुवारी २००२ च्या अंकात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेली बातमी अशी आहे: हिंदूंनी शांतता राखावी आणि संयम पाळावा. माझे मुस्लिम बांधवांना आवाहन आहे की त्यांनी या हत्याकांडाचा निषेध करावा आणि हिंदूंच्या सहनशक्तीची परीक्षा पाहू नये. हिंदू संयम बाळगत असले, तरी अशा घटना जर थांबल्या नाहीत, तर त्याची प्रतिक्रिया उमटू शकते, जी हाताबाहेर जाऊ शकेल’’, असे विहिंपचे आंतरराष्ट्रीय वरीष्ठ उपाध्यक्ष आचार्य गिरिराज किशोर यांनी सोला सिव्हिल हॉस्पिटल येथे बातमीदारांशी बोलताना सांगितले.” 

(संदर्भ :  http://www.timesofindia.com/articleshow.asp? art_ID=2347298 )  

  

  ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने २७ फेब्रुवारी २००२ ला ऑनलाइन दिलेल्या बातमीत म्हटले की, दुसरया दिवशीच्या (२८ फेब्रुवारी) बंदच्या दिवशी सर्व हिंदूंनी घरातच राहावे, असे आवाहन गुजरात विहिंपने केले. हिंदू घरातच थांबले तर साहजिकच हिंसक प्रतिक्रिया उमटणे शक्य नसते. 

कल्पित कथा