विहिंप सारख्या संघपरिवारातील संघटनांनी दंगलींचे आयोजन केले

सत्य- २००२ मध्ये दंगली झाल्या तेव्हा गुजरातच्या १८,६०० गावांपैकी १०,००० गावांमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या शाखा होत्या. त्यांची इच्छा असती तर या १०,००० पैकी अनेक गावांत त्यांना प्रतिक्रियात्मक दंगली सहज घडविता आल्या असत्या. प्रत्यक्षात राज्यातील १८,६०० गावांपैकी फक्त ५० गावांमध्ये दंगली झाल्या. त्यावेळचे विहिंपचे अंतरराष्ट्रीय सरचिटणीस (आणि आता कार्याध्यक्ष) प्रवीण तोगडिया हे पटेल आहेत आणि केशुभाई पटेल यांच्याप्रमाणेच गुजरातच्या सौराष्ट्र भागातले आहेत. असे असूनही सौराष्ट्रात दंगली झाल्याच नाहीत!  

 

   याउलट २८ फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये ज्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर दंगली उसळल्या, त्या विहिंप किंवा संघपरिवारातील कोणतीही संघटना करु शकल्या नसत्या. गोधरा हत्याकांडाची ती उत्स्फूर्त सामाजिक प्रतिक्रिया होती. ज्येष्ठ राजकीय विश्‍लेषक अरविंद बोस्मिया यांनीही हेच म्हटले.

   

   काहीजण असे विचारतात, ‘‘एकीकडे तुम्ही असे म्हणता की काहीच घडले नाही. जेमतेम ४०-५० गावात दंगली झाल्यात. दुसरीकडे तुम्ही म्हणता की दंगली एवढ्या मोठ्या होत्या, की त्या कोणी संघटना एकट्याने  करण्याची शक्यता नाही.’’

 

   या दोन्ही गोष्टी एकाच वेळी खरया आहेत. २८ फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये नरोडा पाटिया भागात मुस्लिमांवर हल्ला करण्यासाठी १७ हजार लोकांचे जमाव एकत्र झाले होते, असे त्या भागातील पोलीस निरीक्षक के.के. मैसोरवाला यांनी म्हटले. ‘इंडिया टुडे’नेही १८ मार्च २००२ च्या अंकात दिलेल्या बातमीत असे म्हटले की, किमान ४ ते ५ हजार लोकांचे किमान ३ जमाव नरोडा पाटियावर चालून गेले. त्यामध्ये चारा जमातीचा समावेश होता. अहमदाबादमध्ये २८ फेब्रुवारीला एक क्षण असा आला की किमान २५ हजार लोक एकाच वेळी विविध मुस्लिम वस्त्यांवर चालून गेले होते. जलद कृती दल आणि सी.आर.पी.एफ.चे जवान हा हिंसाचार नियंत्रित करू शकले नाहीत. ‘द हिंदू’नेही दुसरया दिवशी आपल्या बातमीत म्हटले की परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे वाटत होते. अहमदाबाद पोलिसांना एरवी सरासरी २०० दूरध्वनी यायचे, त्या दिवशी ही संख्या ३,५०० हून अधिक होती. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने त्याचे वर्णन करताना म्हटले आहे की, ‘पोलिसांची उपस्थिती हिंसाचाराच्या महासागरातील एका बिंदूसारखी होती.’ त्यावेळी संपूर्ण पोलीस दल तैनात असतानाही ही स्थिती होती. अहमदाबाद फायर ब्रिगेडला, जिला १०० ठिकाणी पोचण्याची क्षमता होती, २८ फेब्रुवारीला अहमदाबादला ४०० कॉल आले. अहमदाबादमध्ये केवळ २४ तासात एवढे मोठे जमाव जमविणे संघपरिवाराच्या किंवा इतर कोणत्याही संघटनेच्या आवाक्याबाहेरचे काम होते.

 

   पण, गुजरातमध्ये २८ फेब्रुवारीला किंवा त्यानंतर, विहिंपच्या शाखा ज्या १०,००० गावांत चालू होत्या, तेथे विहिंप सहजपणे दंगली घडवू शकली असती, जर घडवायची इच्छा असती.

 

   २७ फेब्रुवारीला गोधरा हत्याकांड घडले. त्याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक निवेदन प्रसिद्ध केले. त्यात म्हटले होते, ‘‘संघ या हत्याकांडाचा निषेध करतो आणि संयम बाळगण्याचे आवाहन करतो.’’ ‘हिंदू’ या दैनिकानेही २८ फेब्रुवारीच्या अंकात ही बातमी दिली असून त्यात म्हटले, ‘(२७ फेब्रुवारीला) लोकांना संयम बाळगण्याचे आवाहन रा.स्व.संघाने केले आहे.’ या आवाहनाची स्कॅन केलेली कॉपी आपण दुसरया प्रकरणात पाहिली आहे. १० मार्च २००२ च्या ‘ऑर्गनायझर’च्या अंकात संघाचे तत्कालीन सरकार्यवाह मोहन भागवत यांनी २७ फेब्रुवारीला केलेले आवाहनही आपण पाहिले आहे. ‘टेलिग्राफ’(कोलकाता) ने आपल्या २८ फेब्रुवारी २००२ च्या अंकात म्हटले, “पंतप्रधानांच्या पाठीमागे रा.स्व.संघ ठामपणे उभा राहिला, संयमाचे आवाहन करुन. सहसरर्कावाह मदनदास देवी म्हणाले, ‘हिंदू समाजाच्या सहिष्णुतेच्या कसोटीची ही वेळ आहे. लोकांनी कायदा आपल्या हातात घेण्याऐवजी गंभीर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारशी सहकार्य करावे.’’’

(संदर्भ: http://www.telegraphindia.com/1020228/frontpa.htm#head1)

 

   रेडिफ डॉट कॉमने वृत्तसंस्थांचा हवाला देत २ मार्च २००२ ला दिलेले वृत्त असे आहे –

 

‘‘संघ, विहिंप कडून गुजरातमध्ये शांततेचे आवाहन

   गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलींनंतर संघ आणि विहिंपने शनिवारी (२ मार्च २००२ ला) आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले की, देशातील शांतता ढळेल अशी कोणतीही कृती टाळा आणि आशा व्यक्त केली की शहाणपण नांदेल.

   संघाचे सरकार्यवाह मोहन भागवत यांनी दिल्लीमध्ये प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की: “हिंदुत्वावर विश्वास असणारया संघस्वयंसेवक, सहानुभूतीदार आणि िमत्रांना मी आवाहन करतो की घोषणाबाजी, दगडफेक यासारख्या शांतता भंग करणारया कोणत्याही गोष्टींपासून दूर रहा, सध्याच्या देशातील नाजूक परिस्थितीला लक्षात घेऊन, कारण त्यामुळे राष्ट्रविरोधी आणि अतिरेकी शक्तींनाच बळ मिळेल. इतर धर्मीयांनाही त्यांनी आवाहन केले की ‘अतिरेक्यांच्या चिथावणीला बळी पडू नका आणि आपल्या हिंदू बांधवांप्रमाणे आपणही भारतमातेची लेकरे आहेात, हे समजून वागा.’

   दरम्यान, विहिंपनेही ‘गुजरातमधील सध्याचा हिंसाचार थांबवा’ असे आवाहन करताना म्हटले आहे, ‘कोणाही विरुद्धचा कोणत्याही प्रकारचा हिंसाचार चिंताजनक आहे.’ नवी दिल्लीमध्ये बातमीदारांशी बोलताना विहिंपचे प्रवक्ते वीरेश्‍वर द्विवेदी म्हणाले, ‘गोधरातील घटना आणि नंतरचा हिंसाचार अत्यंत दुर्दैवी आहे, कोणाही विरुद्धचा कोणत्याही प्रकारचा हिंसाचार चिंताजनक आहे.’

   ‘गुजरातमधील चालू असलेले हत्याकांड थांबवा’ असे आवाहन करून ते म्हणाले, ‘लवकरच सर्वांना सदबुद्धी होईल अशी आशा आहे.’ दंगलीत मारले गेलेल्यांबद्दल दु:ख व्यक्त करून द्विवेदी यांनी राज्यातील हिंसाचाराला बळी पडलेल्यांबद्दल सहानुभूती व्यक्त केली. पण विरोधी पक्षांनी आता परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गुजरातमध्ये शिष्टमंडळ पाठविण्याचे ठरविले आहे, पण गोधरा हत्याकांडानंतर त्यांना असे करायचे सुचले नाही, याबद्दल खेद व्यक्त करून ते म्हणाले, ‘हे सर्व मतपेटी डोळ्यासमोर ठेवून केले जात आहे’.- वृत्तसंस्था.’’

(संदर्भ : http://www.rediff.com/news/2002/mar/02train10.htm )

 

   मोहन भागवत यांचे निवेदन २७ फेब्रुवारीलाच प्रसिद्ध झाले होते आणि ते ‘ऑर्गनायझर’ साप्ताहिकाच्या १० मार्च २००२ च्या अंकात (२७ फेब्रुवारीपर्यंतच्या घटनांच्या बातम्या देणारे) छापले गेले होते. विहिंपनेही शांततेसाठी आवाहन केले. कोणतीही मोठी दंगल सुरू व्हायच्या आधी २८ फेब्रुवारी २००२ च्या अंकात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेली बातमी अशी आहे: हिंदूंनी शांतता राखावी आणि संयम पाळावा. माझे मुस्लिम बांधवांना आवाहन आहे की त्यांनी या हत्याकांडाचा निषेध करावा आणि हिंदूंच्या सहनशक्तीची परीक्षा पाहू नये. हिंदू संयम बाळगत असले, तरी अशा घटना जर थांबल्या नाहीत, तर त्याची प्रतिक्रिया उमटू शकते, जी हाताबाहेर जाऊ शकेल’’, असे विहिंपचे आंतरराष्ट्रीय वरीष्ठ उपाध्यक्ष आचार्य गिरिराज किशोर यांनी सोला सिव्हिल हॉस्पिटल येथे बातमीदारांशी बोलताना सांगितले.” 

(संदर्भ :  http://www.timesofindia.com/articleshow.asp? art_ID=2347298 )  

  

  ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने २७ फेब्रुवारी २००२ ला ऑनलाइन दिलेल्या बातमीत म्हटले की, दुसरया दिवशीच्या (२८ फेब्रुवारी) बंदच्या दिवशी सर्व हिंदूंनी घरातच राहावे, असे आवाहन गुजरात विहिंपने केले. हिंदू घरातच थांबले तर साहजिकच हिंसक प्रतिक्रिया उमटणे शक्य नसते. 

कल्पित कथा

नरेंद्र मोदी म्हणाले, ‘प्रत्येक क्रियेला तेवढीच आणि विरुद्ध प्रतिकिया उमटते’

सत्य- बलबीर पुंज लिहितात, ‘‘धडधडीत कल्पित कथांनी गुजरातचे सत्य झाकोळून टाकले आहे. ‘प्रत्येक क्रियेला तेवढीच आणि विरुद्ध प्रतिकिया उमटते’, असा न्यूटनचा तिसरा सिद्धान्त मोदींनी सांगितल्याचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने ३ मार्चच्या अंकात दिले होते. खरे तर मुख्यमंत्री असे काहीच म्हणाले नव्हते. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वगळता इतर कोणत्याही वृत्तपत्राने असे वृत्त मूळ बातमीत दिले नव्हते (३ मार्चला). पण त्यानंतर लिहिण्यात आलेल्या अनेक संपादकीयांतून आणि लेखांतून याच आधारावर गरळ ओकण्यात आले. मोदींच्या सर्व नकारांना केराच्या टोपलीत फेकण्यात आले.”

 

   विरेंद्र कपूर यांनी १९ मार्च २००२ च्या ‘सायबरनून’च्या अंकात लिहिले: 

   ‘‘आपल्या तोंडी ‘ते’ वाक्य घालणारया इंग्रजी वृत्तपत्राला संतप्त मोदींनी प्रतिक्रिया देणारे आणि निषेध नोंदविणारे पत्र पाठविले, ज्यात त्यांनी म्हटले की त्या पत्रकाराला ते कधीही भेटले नाही आणि कुठेही तसे वाक्य उच्चारले नाही, तसे वाक्य उच्चारायची त्यांना संधीच मिळाली नाही, त्यामुळे त्या ‘शोध लावणारया वार्तांकनात’ तातडीने दुरुस्ती करावी. वृत्तपत्राच्या संपादकांनी दुरुस्ती करण्याचे नाकारले आणि मोदींच्या पत्रावर दोन आठवडे बसून राहिले. वृत्तपत्राचे सर्वांत वरिष्ठ संपादक यांचे चालले असते तर ते कदाचित ते पत्र छापू शकले असते. पण तेथे त्यांचा अधिकारच चालत नव्हता. ‘संघपरिवाराच्या संबंधातील सर्व बातम्या दाबून टाका’ असे म्हणणारया नव्या पत्रकारांची फौजच तेथे जमली आहे. वृत्तपत्राच्या व्यवस्थापनाला तर जाहिरातींतून िमळणारया महसुलापलीकडे काही दिसत नाही. त्यामुळे मोदींचे पत्र अजून प्रकाशित झाले नाही. त्यामुळे माध्यमे त्यांच्याबाबत पूर्वग्रहदूषित आहेत आणि त्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करीत आहेत, हे मोदींचे म्हणणे सर्वस्वी चुकीचे नाही. कारण मोदींचे हे वाक्य या वृत्तपत्रात प्रकाशित होताच, इतर सर्व लिखित व टी.व्ही. माध्यमांनी ते पुन्हा पुन्हा प्रकाशित आणि प्रसारित केले.

  अहमदाबाद आणि राज्यातील इतर ठिकाणी अल्पसंख्यकांवर सूड म्हणून झालेले जीवघेणे हल्ले योग्य ठरविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी न्यूटनचा तिसरा सिद्धान्त ज्या दिवशी सांगितला गेल्याचा दावा केला गेला, त्या दिवशी टाईम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्रातील कोणीही मुख्यमंत्र्यांना भेटलाच नव्हता, हे आता चौकशीतून बाहेर आले आहे. त्या वृत्तपत्राच्या संपादकांनीही ‘मोदी सरकारची मानसिकता सांगण्यासाठी त्या बातमीदाराने ‘ते’ वाक्य आपल्या मनाने बनविले’, असा निष्कर्ष काढला. दिल्लीमध्ये तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी बातमीदारांच्या एका एकत्रीकरणात बोलताना या वृत्तपत्राचे दिल्लीतील डेप्युटी ब्यूरो चीफ असे म्हणाले की, ‘फॅसिस्ट शक्तींशी संघर्ष करा आणि त्यांना ‘आपल्या’ वृत्तपत्रात अजिबात स्थान देऊ नका.’ अर्थात हे करण्यासाठी ही सर्व बातमी पूर्णपणे कल्पित होती.

   आपला स्वत:चाच फासिझम ब्रॅंड चालविणारया या लोकांच्या वागण्याला वृत्तपत्राच्या मालकांनी आता जागे होणे आवश्यक आहे. दरम्यान मोदी या संदर्भात प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाकडे तक्रार करण्याचा विचार करीत आहेत.’’

 

   ‘इंडिया टुडे’ला नरेंद्र मोदी यांनी दिलेली एक मुलाखत ८ एप्रिल २००२ च्या अंकात प्रसिद्ध झाली. त्यात ते म्हणाले, ‘‘दंगली सुरू झाल्यानंतर मी ‘प्रत्येक क्रियेला विरोधी प्रतिक्रिया असते,’ असे म्हटल्याचे प्रसिद्ध झाले. खरे तर मी अशा प्रकारचे काहीच बोललो नव्हतो. तरीही एका वृत्तपत्राने मी असे म्हटल्याचा फथळा दिला. मी असे काहीच म्हणालो नव्हतो, असे सांगणारे पत्रही मी त्या वृत्त्पत्राच्या संपादकांना लिहिले. माझ्या त्या पत्रकार परिषदेत इलेक्ट्रॉनिक माध्यमेही उपस्थित होती. त्यांचे चित्रीकरण आपण तपासू शकता.’’

(संदर्भ : http://archives.digitaltoday.in/indiatoday/20020408/cover6.html)

 

   ‘द हिंदुस्तान टाइम्स’ला नरेंद्र मोदी यांनी दिलेली मुलाखत १० मार्च २००२ च्या अंकात प्रसिद्ध झाली. त्यात ते म्हणालेत, ‘‘त्या प्रकारचे कोणतेही वक्तव्य मी केले नाही. एका मोठ्या वृत्तपत्राने ‘प्रत्येक क्रियेला सारखीच आणि विरोधी प्रतिक्रिया असते’, हा न्यूटनचा सिद्धान्त माझ्या तोंडी घातला. शाळा सोडल्यापासून मी न्यूटनचे नावही कधी घेतले नाही. काल्पनिकता आणि स्वत:च्या इच्छा मांडण्यासाठीच कोणी काही करीत असेल, तर मी काहीच करू शकत नाही. त्याचा उपयोग समाजाला होणार असेल, तर मी दु:ख सहन करायलाही तयार आहे. माझ्याविरुद्ध असणारया सर्वांना मी विनंती करतो की गुजरातमध्ये स्थिती सामान्य होईपर्यंत थांबा…’’

 

   अधिकृत नोंदींवरून हे सिद्ध झाले आहे की त्या दिवशी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या कोणाही बातमीदाराला मोदींनी भेटीची वेळ दिली नव्हती. जेव्हा कोणी आरोप करतो तेव्हा त्याला त्याचा पुरावाही द्यावा लागतो. आजपर्यंत कोणीही हे सिद्ध करू शकले नाही की मोदींनी हे वाक्य उच्चारले होते. त्याबद्दल माफी मागण्याचे तर सोडाच, पण त्यांनी मोदींचा खुलासाही ठळकपणे प्रसिद्ध केला नाही. ‘प्रत्येक क्रियेला सारखीच आणि विरोधी प्रतिक्रिया असते’ असे नरेंद्र मोदी म्हणाल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या एस.आय.टी.ने आपल्या अहवालात म्हटले. माध्यमांतील काही लोकांना हे म्हणणे पचविता आले नाही. त्यामुळे ‘मोदींचे वकिल देतील असा अहवाल एस.आय.टी.ने दिला’ असा आरोप काहींनी एस.आय.टी. वर केला. असे मोदी जर म्हणालेच नसतील, तर एस.आय.टी. ने जबरदस्तीने असा खोटा दावा करायला हवा होता का?

कल्पित कथा

कुतुबुद्दीन अन्सारीचे छााचित्र खरे आहे

सत्य – कुतुबुद्दीन अन्सारी दंगलखोरांसमोर दयेची भीक मागत आहेत, असे एक छायाचित्र ‘हिंदू’ने २ मार्च २००२ ला प्रसिद्ध केले. अन्सारी यांनी ‘पुन्हा ते छायाचित्र छापू नका’ अशी विनंती केल्यामुळे आम्ही ते पुन्हा इथे देत नाही. भाजपा, विहिंप आणि बजरंग दल यांची प्रतिमा देशभर मलिन करण्यासाठी हे छायाचित्र पुन्हा पुन्हा वापरण्यात आले. हे पीडित अंसारी दंगलखोरांसमोर प्राणाची भीक मागतात आहेत,असे माध्यमांनी अनेकदा म्हटले आहे. या अन्सारींना पश्‍चिम बंगालमधील डाव्या पक्षांच्या सरकारने मदत दिल्यामुळे, ते कोलकात्यात सुखाने राहात असल्याचे नंतर दाखविण्यात आले. (डाव्या आघाडीने बंगालमध्ये १९७७ ते २०११ राज्य केले). अंसारी नंतर गुजरातला परतले. या घटनेतून अनेक प्रश्‍न उपस्थित होतात. (संघाचे तत्कालीन सरसंघचालक के.एस. सुदर्शन यांनी नागपूरमधील ४ ऑक्टोबर २००३ च्या भाषणात यापैकी काही प्रश्‍न विचारले होते.) ते प्रश्‍न असे :

१. हे छायाचित्र बनावट असावे, अशा अनेक गोष्टी सहज लक्षात येतात. (म्हणजे अन्सारी खरोखरच अशा स्थितीत असावेत, पण घटना संपल्यानंतर, जमाव निघून गेल्यानंतर ते चित्र घेतले गेले असावे, किंवा एक शक्यता अशीही आहे, की घटना घडून गेल्यानंतर छायाचित्रकाराने अन्सारींना ती पोज घेण्यास सांगितले असेल, पण अशी शक्यता आम्हाला कमी वाटते.) अन्सारींच्या चेहरयावर बँडेज बांधले आहे. घटना घडून गेल्यानंतर बँडेज बांधून मग छायाचित्र काढले असावे, असे स्पष्ट दिसते. रक्तासाठी हपापलेला प्रक्षुब्ध जमाव खरोखरच अन्सारींच्या अंगावर चालून येत असताना त्यांनी दयेची भीक मागितली असताना हे छायाचित्र काढले असेल, तर त्यांना बँडेज बांधायला वेळ कधी िमळाला?

२. या छााचित्रात अन्सारी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून दंगलखोरांकडे दयेची भीक मागत आहेत, असे म्हणतात, पण छायाचित्रात एकही दंगलखोर मात्र दिसत नाही. छााचित्रकार आर्को दत्त त्यावेळीच छायाचित्र काढायला इमारतीत हजर होते, आणि त्या दोघांनाही दंगलखोरांनी काहीच न करता मोकळे सोडले, हे विश्वास ठेवायला कठीण वाटते. कुतुबुद्दीन अन्सारी हे या दंगलीचे पीडित आहेत, यात शंका नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. पण याचा अर्थ, खोटे छायाचित्र काढून जगभर वितरित करून निष्पाप लोकांना अतिरेकासाठी उद्युक्त करण्याचा परवाना त्यांना (मीडिया व मुस्लिम अतिरेकींना) कोणी दिलेला नाही.

३. दंगलखोरांनी त्यांच्यावर हल्ला न करता, त्यांना मोकळे कसे सोडले?

४. दंगलखोरांनी छायाचित्रकाराला असे छायाचित्र कसे काढू दिले? त्याच्यावर हल्ला का केला नाही?

५. अन्सारी आणि तो छााचित्रकार या दोघांनाही संतप्त जमावाने जिवंत सोडले, तर किमान त्यांचा कॅमेरा तरी का मोडून टाकला नाही?

६. रॉयटरचे छायाचित्रकार आर्को दत्त वरीलपैकी एकातरी प्रश्‍नाचे उत्तर देऊ शकतात का?

७. या सर्व प्रश्‍नांची किंवा या घटनाक्रमातून समोर येणारया इतर प्रश्‍नांची उत्तरे अन्सारी देऊ शकतात का?

 

   या सर्व प्रकरणाचे बळी ठरलेले कुतुबुद्दीन अन्सारी यांनी असे म्हटल्याचे कळते, ‘जमाव माझ्या घरावरून निघून गेल्यानंतर हे छायाचित्र घेतले आहे. त्यावेळी पोलीस तेथे होते आणि मी खूप घाबरलो होतो. अशावेळी मी पोलिसांना म्हणालो की मला वाचवा, तेव्हा ते छायाचित्र घेण्यात आले.’ अशाच प्रकारची माहिती गुजरातमधील एका वरिष्ठ पत्रकाराने लेखकाला दिली. पण लेखकाला मात्र तशा प्रकारची कोणतीही माहिती किंवा बातमी इंटरनेटवर सापडली नाही. अन्सारींवर अन्याय करायचा नसेल, तर हेही सांगितले पाहिजे की, “दंगलखोरांकडे आपल्या प्राणाची भीक मागत होतो”, असे अंसारी म्हणाल्याचेही कुठलेही वृत्त वेबवर नाही (किमान या लेखकाला दिसले नाही). कदाचित असे असेल की, आपण रक्तपिपासू जमावासमोर अशी भीक मागितली, हे अन्सारी यांनीच नाकारले. आता कोणीतरी हे त्यांना स्पष्टपणे विचारले पाहिजे. आपण जमावापुढे प्राणाची भीक मागितली, असा जर अन्सारींचा दावा असेल, तर चेहरयावर बँडेज कुठून आले, हेही विचारले पाहिजे. आपल्या छायाचित्राचा वारंवार उयपोग झाल्यामुळे आणि त्यातून उद्भवलेल्या त्रासामुळे ते ऑगस्ट २००३ पासूनच ‘मला त्रास देऊ नका आणि मोकळं सोडा’ असे माध्यमांना सांगत होते. 

(संदर्भ:   http://hindu.com/2003/08/08/stories/2003080806871100.htm )

 

   आम्ही पुन्हा एकदा सांगतो की दंगलीतील पीडितांबद्दल (मुसलमान असो की हिंदू) आम्हाला आत्यंतिक सहानुभूती आहे. काहीही असले, तरी कुतुबुद्दीन अन्सारी हे दंगलीचे पीडित होते, यात शंकाच नाही.

 

   आपण दुसरया प्रकरणात गोधरा हत्याकांडातील थरकाप उडविणारी छायाचित्रांची लिंक पाहिली आहे. ही छायाचित्रे १०० टक्के खरी असली तरी माध्यमे विशेषत: एन.डी.टी.व्ही. आणि सी.एन.एन.आय.बी.एन.सारख्या वाहिन्या ती छायाचित्रे दाखविण्याचे कधी स्वप्नातही आणणार नाहीत. लोकांच्या भावना भडकविणारे कुतुबुद्दीन अन्सारीचे छायाचित्र मात्र जगभर प्रसारित केले जाईल. गोधरामध्ये हिंदूंना जाळून मारल्यानंतर मुस्लिमांच्या मनात निर्माण झालेला अपराधीपणा, त्या हत्याकांडाची छायाचित्रे पाहिल्यानंतर इतर मुस्लिमापर्यंत (कदाचित उदारमतवाद्यापर्यंत) पोचला असता तर गोधरानंतरच्या दंगलींमुळे ते एवढे भडकले नसते. (या दंगलीही एकतर्फी नव्हत्या.)

कल्पित कथा

एहसान जाफरी प्रकरणात महिलांवर बलात्कार झालेत

सत्य- अरुंधती रॉय यांनी ‘आउटलुक’ साप्ताहिकाच्या ६ मे २००२ च्या अंकात एहसान जाफरी प्रकरणावर लिहिलेल्या लेखातील काही अंश असा आहे: 

 

   ‘‘काल रात्री बडोद्याहून मला एका मैत्रिणीचा फोन आला. ती रडत होती. काय घडले हे सांगायला तिला १५ िमनिटे लागली. ते काही फार गुंतागुंतीचे नव्हते. फक्त, तिची मैत्रीण सईदा एका जमावाच्या हाती सापडली. फक्त, तिचे पोट फाडण्यात आले आणि पोटात जळत्या चिंध्या भरण्यात आल्या. फक्त, ती मेल्यानंतर कोणीतरी तिच्या कपाळावर ॐ हे अक्षर कोरले…

   …माजी कॉंग्रेस खासदार इक्बाल एहसान जाफरी यांच्या घराला एका जमावाने वेढा घातला. त्यांनी पोलीस महाअधीक्षक, पोलीस आयुक्त, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांना फोन केले. पण सर्वांनी दुर्लक्ष केले. (नरेंद्र मोदी यांना फोन केल्याचा दावा इथे केलेला नाही, याची नोंद घ्या!) त्यांच्या घराभोवती िफरणारया पोलीस गाड्यांनीही दखल घेतली नाही. जमाव घरात घुसला, त्यांनी जाफरी यांच्या मुलींना विवस्त्र करून जिवंत जाळले. नंतर एहसान जाफरी यांचे मस्तक उडविण्यात आले. अर्थात, राजकोटमधील फेब्रुवारीत झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत जाफरी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर कडवट टीका केली होती, हा निव्वळ योगायोग आहे…’’ 

(संदर्भ : http://www.outlookindia.com/article.aspx?215477 )

 

   भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन राज्यसभा खासदार बलबीर पुंज यांनी अरुंधती रॉय यांना दिलेले प्रत्युत्तर छापण्याची हिंँमत ‘आउटलुक’ने दाखविली. या प्रत्युत्तराचे शीर्षक असे होते ‘‘गुजरात जळत असताना सत्याचा अपलाप”(“Fiddling with facts while Gujarat burns”). 

 

   ‘‘सुरुवात : माध्यमांमधील रॉय मंडळी अर्धसत्य आणि आणखीन वाईट सांगून भारताचे नुकसान करीत आहेत. (इथे पुंज यांनी रॉय यांच्या लेखातील काही वाक्ये दिली आहेत…)

   ‘डेमोक्रसी: हू इज शी व्हेन शी इस अ‍ॅट होम?’ या ‘आउटलुक’मधील आपल्या लेखात ‘गॉडेस ऑफ स्मॉल थिंग्ज’ म्हणून ओळखल्या जाणारया अरुंधती रॉय यांनी गुजरातचे असे मोठे चित्र रेखाटले आहे. संघपरिवाराविरुद्ध केले जाणारे जवळपास सर्व आरोप रॉय यांनी एकाच लेखात नीटपणे केले आहेत. ‘आउटलुक’सारखे प्रतिष्ठित साप्ताहिक एखाद्या बुकर पुरस्कारविजेत्या लेखकाचा लेख प्रसिद्ध करते, तेव्हा ते गंभीर समजावे लागते. (आमचे मत-–इथे बलबीर पुंज यांच्या मताशी आम्ही सहमत नाही. आमच्या मते ‘आउटलुक’ हे ‘प्रतिष्ठित साप्ताहिक’ नाही, तर कॉंग्रेसच्या दावणीला बांधलेले नितकालिक आहे. अरुंधती रॉय यांना बुकर पुरस्कार िमळाला असला, तरी त्या अतिडाव्या लेखिका म्हणून ओळखल्या जातात आणि अनेक लोक त्यांचे लेखन गंभीरपणे घेत नाहीत.) ‘सत्य’ सांगण्यासाठी रॉय यांनी आपली प्रतिभा आणि भाषाकौशल्य पणाला लावले आहे. त्यांचे हे चित्रांकित तपशील पहा – ‘जमाव घरात घुसला, त्यांनी जाफरींच्या मुलींना विवस्त्र केले आणि जिवंत जाळले.’…

   हे हृदयस्पर्शी नक्कीच आहे, पण प्रामाणिक मात्र नाही. जाफरी दंगलीत मारले गेले, पण त्यांच्या मुलींना ‘विवस्त्र’ही केले गेले नाही किंवा ‘जिवंत जाळले’ही गेले नाही. जाफरींचा मुलगा टी.ए. जाफरी याची मुलाखत एका वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर प्रकाशित झाली आहे. शीर्षक आहे – ‘‘माझ्या वडिलांचे घर लक्ष्य आहे, हे कोणालाच माहीत नव्हते.” (एशियन एज, दिल्ली आवृत्ती, २ मे २००२) ते म्हणतात, ‘माझ्या भावा आणि बहिणींपैकी मी एकटाच भारतात राहतो. कुटुंबात मी सर्वात मोठा आहे. माझा भाऊ आणि बहीण अमेरिकेत राहातात. मी ४० वर्षांचा असून माझा जन्म आणि पूर्ण आयुष्य अहमदाबादमध्येच गेले.’

   याचा अर्थ रॉय खोटे बोलत आहेत, कारण जाफरी नक्कीच खोट बोलत नाही आहेत. पण आजवर उघड्या न पडलेल्या माध्यमांच्या अशा शेकडो असत्य कथांचे काय? त्यांचा ७ पानांचा (सुमारे ६,००० शब्द) लांबलचक लेख भारत आणि संघपरिवार याबद्दलचा विद्वेष ओकणारा आहे, त्याचा आधार फक्त दोन विशिष्ट कथा होत्या. त्यातील एक खोटी असल्याचे आता आपल्याला निश्चित कळले आहे…

   …संघपरिवाराची ‘लॅबोरेटरी’ गुजरात हा प्रदेश आहे, असे त्या म्हणतात. प्रत्यक्षात धर्मनिरपेक्षतावादी मूलतत्त्ववाद्यांनी (‘secular fundamentalists’) गोधरा प्रकरणाचा उपयोग crucible म्हणून केला. रामसेवकांना जिवंत जाळून मारले असताना या घटनेचा निषेध करतानाच त्यांनी दोषही रामसेवकांवरच ढकलला, यात काही आश्चर्य नाही. (गोधरातील) नृशंस हत्याकांडाचे समर्थन करण्यासाठी त्यांनी टपरीवाल्यांशी झालेले भांडण, महिलांशी गैरवर्तन आणि प्रक्षोभक घोषणा, अशा काल्पनिक घटना आपल्या मनाने शोधून काढल्या…

   …पण गुजरातमध्ये घडला तो मुस्लिमांचा ‘नरसंहार’ होता का? दंगलीत सुमारे ९०० लोक मारले गेले (हिंदू, मुस्लिम दोन्ही). हे नक्कीच एका समुदायाचे ‘नरसंहार’ नव्हते. तरीही १८९३ मध्ये मुंबई आणि आझमगडमध्ये झालेल्या दंगलींपासून सुरू झालेल्या दीर्घ आणि दुर्दैवी सांप्रदायिक दंगलींच्या साखळीपैकीच ही देखील एक लज्जास्पद घटना होती. मोगलकाळात १७१४ मध्ये झालेल्या होळी दंगलीपासून सुरुवात केली, तर एकट्या अहमदाबाद शहरानेच १० मोठ्या दंगली अनुभवल्याचे नोंदविले गेले आहे.

   १७१४ मध्ये संघपरिवार नव्हता आणि १९६९ आणि १९८५ च्या दंगलकाळात तो महत्त्वाची शक्ती  नव्हता. गुजरात हा ‘संघपरिवाराची प्रयोगशाळा’ नव्हता तेव्हा झालेल्या दंगलींचे विश्‍लेषण आपण कसे करणार?…

   …गोधरा हत्याकांडामुळेच गुजरातमध्ये मुस्लिमांविरुद्धचा उत्स्फूर्त हिंसक उद्रेक झाला. हे दंगलखोर मुख्यत: हिंदूच असल्यामुळे पहिल्या ३ दिवसांत पोलिसांच्या गोळीबारात मारले गेलेल्यांपैकी ७५ टक्के लोक हिंदू होते. वास्तवात १८ एप्रिलर्पंत पोलीस गोळीबारात मारले गेलेल्यात हिंदूंचीच संख्या मुस्लिमांपेक्षा जास्त होती.

   पण गेले ३ आठवडे मुस्लिम हिंदूंवर हिंसक हल्ले चढवीत आहेत. त्यामुळे पोलिस गोळीबारातील मृतांमध्ये स्वाभाविकपणे त्यांचीच संख्या जास्त आहे. पोलिसांनी एकूण ३४ हजार लोकांवर दंगलींचे गुन्हे नोंदविले आहेत. त्यापैकी बहुसंख्य हिंदू आहेत. जाळपोळ आणि लुटालुटीमध्ये दोन्ही समाजाच्या मालमत्तेचे आणि व्यवसायांचे जबर नुकसान झाले आहे. दंगलखोर धर्मांधतेची भावना मनात ठेवून आपले लक्ष्य ठरवीतात, पण लुटालूट करणारे तसे नसतात. ते कुठेही, कशीही लुटालूट करतात. १ लाख मुस्लिम दंगलग्रस्त म्हणून शिबिरांत आहेत, पण तसेच ४० हजार हिंदूही आहेत. या दंगली भयंकर आणि अत्यंत दु:खद आहेत. पण त्यांना ‘नरसंहार’ का म्हणावे? त्याचा फायदा कोणाला होतो? दंगलीतील पीडितांना नक्कीच नाही, त्याचा फायदा होतो फक्त आपल्या सीमेपलीकडील शत्रूंना.

   भारतात आतापर्यंत झालेल्या असंख्य दंगलींसारखीच ही एक दंगल असली, तरी यावेळेस जगभर भारताची मोठी अप्रतिष्ठा झाली आहे, जी आधी झाली नव्हती. का? याचे गुन्हेगार, गोधरात रेल्वे डब्यांना पेटवून देऊन निष्पाप कारसेवकांना जिवंत जाळणारे आणि त्यांनंतर दंगलींच्या वेड्या हिंसाचारात सहभागी होणारे आहेत. पण यातील खरे खलनायक मात्र भारताची प्रतिमा विद्रूप करणारे माध्यमांतील रॉय यांच्यासारखे लोक आणि सार्वजनिक जीवनातील काही लोक आहेत. संघपरिवाराशी असलेले त्यांचे भांडण आणि वैचारिक व राजकीय विरोध याचे हिशोब चुकते करण्यासाठी ते अर्धसत्य आणि कल्पित थापा यांचे बेमालूम िमश्रण करीत आहेत.

   आपल्या विद्वेषाचे गरळ ओकण्यासाठी रॉय (या अनेक धर्मनिरपेक्षतावाद्यांच्या रोल मॉडेल आहेत) सईदा नावाच्या एका महिलेची कथा सांगतात, ‘तिचे पोट फाडण्यात आले आणि त्यात जळत्या चिंध्या भरण्यात आल्या.’ मी अशाच काही भयानक कहाण्या संसदेतही ऐकल्या. त्यामध्ये वारंवार सांगितल्या जाणारया कहाण्या महिलेंवरील बलात्काराच्या होत्या, काही घटनांमध्ये सामुदायिक बलात्काराच्या काहाण्या, त्यांचे पोट फाडून भृणाला बाहेर काढण्याच्या आणि त्रिशूळाच्या टोकावर ठेवून नाचविण्याच्या कहाण्या. पण सर्व तपशील असणारे एकही विशिष्ट प्रकरण कोणीही मला संसदेत देऊ शकले नाही. रॉय यांनी एक दिले, पण ते पूर्णपणे कल्पित असल्याचे सिद्ध झाले…

   …कल्पित कथा, स्वरचित कथा यांनी गुजरातचे सत्य झाकोळून टाकले आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने (३ मार्च २००२) आपल्या बातमीत, मोदींनी न्यूटनच्या तिसरया नियमाचा उल्लेख केल्याचे म्हटले होते – ‘प्रत्येक क्रियेला तेवढ्याच क्षमतेची आणि विरोधी प्रतिक्रिया उमटते.’ मुळात मुख्यमंत्री मोदी असे काही बोललेच नव्हते आणि ‘टाइम्स’शिवाय इतर कोणत्याही वृत्तपत्राने मोदींच्या या तथाकथित वक्तव्याचा उल्लेख ३ मार्चला केला नव्हता. पण त्यानंतरच्या कितीतरी संपादकीयांमध्ये या विधानाला आधार मानून गरळ ओकण्यात आले. मोदींनी असे विधान केल्याचे नाकारले असतानाही, त्यांच्या खुलाशांना केराच्या टोपलीत टाकण्यात आले.

   गुजरातमधील दंगलींच्या वार्तांकनाबद्दल ‘एडिटर्स गिल्ड’ने इंग्रजी वृत्तपत्रांची पाठ थोपटली, तर गुजराती भाषिक वृत्तपत्रांवर कठोर टीका केली. गुजराती वृत्तपत्रे अतिशयोक्तीबाबत दोषी असतील, पण त्यांनी रॉय यांच्यासारख्या इंग्रजी माध्यमात प्रसिद्ध झालेल्या कपोलकल्पित कथा तरी दिलेल्या नाहीत. भारताचे नाव बदनाम करणारया, नाजूक क्षणी सांप्रदायिक तेढ वाढविणारया, अर्धसत्य सांगून असंख्य नागरिकांना भ्रमित करणारया रॉय सारख्या लोकांबद्दल आणि टी.व्ही. माध्यमांबद्दल मात्र ‘गिल्ड’ने टीकेचा चकार शब्दही काढला नाही, हे आश्चर्यकारक आहे. ज्या काही गुन्हेगारांनी बलात्कार केले असतील, त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. पण गेले २ महिने सत्यावर आणि देशावर जे लोक सातत्याने बलात्कार करीत आहेत, त्यांचे काय?”

(संदर्भ : http://www.outlookindia.com/article.aspx?215755 )

 

   यामुळे सगळाच खेळ उलटला. अरुंधती रॉय यांनी २७ मे २००२ च्या अंकात माफी मागणारे पत्र लिहिले. ‘टु द जाफरी फॅमिली, ऍन अपॉलॉजी’ (जाफरी परिवराला एक माफी) असे शीर्षक असणारया या पत्रातील मजकूर असा –

   ‘‘जेव्हा पोलीस गुन्ह्याची नोंद करण्यास इच्छूक नाहीत, सत्य जाणून घेणारयांच्या विरोधात प्रशासन उघडपणे असते आणि हत्या अनिर्बंधपणे चालू असतात [अशी स्थिती गुजरातमध्ये सध्या आहे], तेव्हा भीती आणि अफवा महत्त्वाची भूिमका बजावतात. (रॉय सर्व दोष दुसरयांना कसा देत आहेत, ते पहा!) बेपत्ता झालेले लोक मृत झाले आहेत, असे समजले जाते. ज्यांना जाळून मारले, त्यांची ओळख पटत नाही. अशा परिस्थितीत सुन्न झालेले आणि भेदरलेले लोक संदिग्ध अवस्थेत असतात.

   म्हणूनच आमच्यासारखे लेखक लिहिताना अत्यंत भरवशाच्या सूत्रांकडून िमळालेल्या माहितीचा वापर करीत असले, तरी चुका होऊ शकतात. सध्याच्या हिंसाचार, दु:ख आणि अविश्‍वासाच्या वातावरणाने लोक भारलेले असताना दाखवून दिलेल्या चुका दुरुस्त करणे, तेवढेच महत्त्वाचे आहे.

   ‘डेमोक्रसी : हू इज शी, व्हेन शी इज ऍट होम’ (Democracy: Who is she when she is at home?), या ६ मे च्या माझ्या निबंधामध्ये एक चूक झाली आहे. एहसान जाफरी यांच्या क्रूर हत्येचे वर्णन करताना, वडिलांबरोबरच त्यांच्या मुलीही मारल्या गेल्या, असे मी म्हटले होते. पण माझ्या हे लक्षात आणून देण्यात आले आहे, की ते चूक आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार एहसान जाफरी यांच्याबरोबर त्यांचे ३ भाऊ आणि २ पुतणे मारले गेले. त्या दिवशी चमनपुरा भागात बलात्कार करून मारल्या गेलेल्या १० महिलांमध्ये जाफरी यांच्या कन्या नव्हत्या.

   त्यांच्या दु:खात भर घालण्याच्या प्रमादाबद्दल मी जाफरी कुटुंबीयांची माफी मागते. आय ऍम ट्रूली सॉरी! (I am truly sorry.)

   माझी माहिती ही दोन सूत्रांकडून तपासून घेतली होती. (ती प्रत्यक्षात चुकीची ठरली.) ‘टाइम’ नितकालिकाच्या ११ मार्चच्या अंकात मीनाक्षी गांगुली आणि अँथनी स्पीथ यांचा लेख आणि ‘गुजरात कार्नेज २००२ : अ‍ रिपोर्ट टु द नेशन’ या स्वतंत्र सत्यशोधक समितीच्या अहवालातील माहिती. त्रिपुराचे माजी आय.जी.पी. श्री के.एस. सुब्रमण्यम  आणि माजी अर्थसचिव एस.पी. शुक्ला यांनी हा अहवाल तयार केला आहे. या चुकीबद्दल मी श्री सुब्रमण्यम यांच्याशी बोलले. त्यांच्या म्हणण्यानुसार एका वरिष्ठ पोलीस अधिकारयाने त्यांना ही माहिती दिली होती. (हे ‘वरिष्ठ पोलिस अधिकारी’ नेमके कोण होते, हे मात्र सुब्रमण्यम किंवा अरुंधती रॉय सांगायला तयार नाहीत!)

   गुजरातमधील हिंसाचाराचे तपशील सांगत असताना झालेल्या या किंवा अशा प्रामाणिक चुकांमुळे मी, सत्यशोधन समित्या किंवा इतर पत्रकार जे सांगू पहात आहेत, त्याचा सारांश मात्र बदलत नाही.’’

 

   बलबीर पुंज यांनी ४ वर्षांनंतर लिहिलेला एक लेख ‘ऑर्गनायझर’ साप्ताहिकाच्या ९ जुलै २००६ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. त्यात त्यांनी लिहिले: 

 

   ‘‘चार वर्षांपूर्वी अरुंधती रॉय यांच्याबरोबर माझा वृत्तपत्रात वाद झाला होता. कारण होते, गुजरातच्या दंगली. सेक्युलर ब्रिगेडच्या दृष्टीने ही प्रसिद्धीची पर्वणीच होती. पण आज दोडामध्ये हिंदू मारले जात असताना, हे ‘सेक्युलर’ कुठेही दिसत नाहीत, अगदी दुर्बिणीतून पाहिल्यावरही सापडत नाहीत… 

   रॉय यांनी आपल्या विद्वेषाचा विखार ओकताना एक उदाहरण दिले: ‘काल रात्री मला बडोद्याहून एका मैत्रिणीच फोन आला. ती रडत होती. काय घडले ते सांगायला तिला १५ िमनिटे लागली. ते काही फार गुंतागुंतीचे नव्हते. तिची मैत्रीण सईदा एका जमावाच्या हाती सापडली. तिचे पोट फाडण्यात आले आणि पोटात जळत्या चिंध्या भरण्यात आल्या. ती मेल्यानंतर कोणीतरी तिच्या कपाळावर ॐ हे अक्षर कोरले…

   या घृणास्पद ‘घटनेने’ धक्का बसल्यामुळे मी गुजरात सरकारशी संपर्क साधला. तपास करणारया पोलिसांनी असे सांगितले, की सईदा नावाच्या महिलेबाबत अशी काही घटना घडल्याची कोणतीही नोंद बडोद्यातील शहरी किंवा ग्रामीण भागातून झालेली नाही. या सईदाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अरुंधती रॉय यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांची मदत मागितली साक्षीदारांपर्यंत पोचायला, जे दोषींपर्यंत पोचवू शकतील. पण रॉय यांच्याकडून पोलिसांना कोणतेही सहर्काय िमळाले नाही. याउलट रॉय यांनी पोलिसांना आपल्या वकिलामार्फत उत्तर पाठविले की पोलिसांना त्यांच्यावर समन्स बजावण्याचा कोणताही अधिकार नाही. अशा रीतीने त्या तांत्रिक बहाण्यांच्या मागे लपल्या. ‘आउटलुक’मध्ये रॉय यांच्या लेखाचा प्रतिवाद करताना ‘डिसिम्ुलेशन इन वर्ड अँड इमेजेस’ या लेखात मी याचा उल्लेख केला (द आउटलुक, ८ जुलै २००२). ”

 

   बलबीर पुंज यांनीही उल्लेख न केलेल्या काही गोष्टी इथे आम्ही सांगितल्या पाहिजेत. रॉय यांच्या माफीनामाही खोटा आहे, कारण यातही चुका आहेत. ‘त्या दिवशी चमनपुरात १० महिलांवर बलात्कार करून त्यांना मारण्यात आले’ असा दावा त्यांनी या माफीलेखात केला आहे. मार्च २००२ च्या पहिल्या आठवड्यातील सर्व इंग्रजी वृत्तपत्रे वाचल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते, की कोणाच्याही बातमीत बलात्काराचा एक उल्लेखही नाही. ‘टाइम’ या नितकालिकाने ११ मार्च २००२ च्या अंकात या कपोलकल्पित कथा प्रसिद्ध केल्यानंतर मार्चच्या मध्यपासून बलात्काराचे उल्लेख सुरू झाले. ही कथा अरुंधती रॉय यांनी ‘टाइम’ नितकालिकातूनच उचलली. पण रॉय किंवा ‘टाइम’च्या प्रतिनिधींना बलात्काराचे सिद्ध झालेले एकही प्रकरण दाखविता आले नाही, या गुलबर्ग सोसायटी मध्ये, आणि ते दाखवूही शकत नाही. रॉय यांनी जाफरी कुटुंबीयांची माफी मागितली. पण सपशेल खोटे दावे करून. भाजपा आणि नरेंद्र मोदी यांची बदनामी केल्याबद्दल मात्र त्यांनी माफी मागितलेली नाही. त्यांनी हेही करायला हवे होते आणि देशाचीही माफी मागायला हवी होती. पण रॉय माफी मागतानासुद्धा खबरदारी घेतात की ती माफी फक्त ‘जाफरी कुटुंबाची’ असावी.

 

   दुसरी चूक- जाफरी यांच्या घरावर आक्रमण करणारया जमावाला थांबविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला नाही, असा दावा त्यांनी केला आहे. रॉय म्हणतात, ‘डी.जी.पी., पोलीस कमिशनर, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांना त्यांनी केलेले फोन दुर्लक्षिले गेले. त्यांच्या घराभोवती िफरणारया पोलीस व्हॅन्सनेेही हस्तक्षेप केला नाही.’ पुन्हा काय खोटारडेपणा! त्यांच्या घराबाहेर असलेल्या पोलिसांनी दंगलखोरांना केवळ रोखण्याचाच प्रयत्न केला नाही, तर ५ दंगलखोरांना घराबाहेर ठार मारण्यात आले आणि पोलिसांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून १८० मुस्लिमांना वाचविले. जाफरी यांच्या घराबाहेर पोलिसांनी अश्रुधुराची १३४ नळकांडी फोडली आणि गोळीबाराच्या १२४ फैरी झाडल्या, एस. आय. टी. च्या अहवालानुसार, पान १. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नेेही आपल्या ऑनलाइन बातमीत म्हटले आहे, की पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने जमाव पांगविण्यासाठी आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावली. पोलीस निष्क्रिय होते, असा आरोप कुठेही ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने केलेला नाही.

   

   तत्कालीन पोलिस कमिशनर पी.सी.पांडे यांना २८ फेब्रुवारी २००२ ला ३०२ कॉल्स आलेत किंवा त्यांनी केलेत, पण जाफरी यांचा कोणताही कॉल त्यांना आला नाही, असे एस.आय.टी ने त्यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासून म्हटले (एस.आय.टी. आहवाल, पान २०४). आणि त्या दिवशी मुख्यसचिव जी. सुब्बाराव हे सुट्टीवर  विदेशात होते! २२ फेब्रुवारी ला विदेशात गेलेले सुब्बाराव यांना गोधरानंतर परत बोलाविण्यात आले, आणि ते लगेच १ मार्च ला परतले, पण २८ फेब्रुवारीला ते विदेशात होते! हे देखील एस.आय.टी. ने आपल्या अहवालात पान ४४८ वर म्हटले आहे. आणि अरुंधती रॉय दावा करतात की जाफरी यांनी त्यांना वा पांडेंना २८ फेब्रुवारीला फोन केला! या अरुंधती रॉय यांच्या थापा कधी उघड्या पडल्याच नाहीत.

 

   जाफरी यांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना फोन केला होता, असा कोणताही दावा अरुंधती रॉय यांनी मे २००२ मध्येही केला नाही! आता मात्र ‘जाफरींनी मोदींना फोन केला आणि मोदींनी त्यांना शिवीगाळ केली’ अशा थापा सांगितल्या जात आहेत. सत्य असे आहे की त्या दिवशी हिंसाचाराची स्थिती हाताबाहेर गेल्यामुळे परिस्थिती सावरण्याच्या आणि तातडीने लष्कराला बोलाविण्याच्या प्रयत्नांत मोदी गुंतले होते आणि फार व्यस्त होते. जाफरी यांनी मोदींना फोन केल्याची कोणतीही नोंद नाही. एस.आय.टी. ने आपल्या अहवालात म्हटले आहे की जाफरी यांचा लॅंडलाईन हा एकमेव फोन पूर्ण रहिवाशी इलाक्यात कार्यरत होता. जाफरींकडे मोबाईल नव्हता आणि इतर कोणाकडेही नव्हता. जाफरी यांनी मोदींना फोन केला आणि ‘मोदींनी मला शिवीगाळ केली’ असे जाफरींनी मरण्यापूर्वी आपल्याला सांगितल्याचा दावा करणारा एक साक्षीदार इम्तियाज़ पठाण ‘ट्यूटर’ करून (शिकवलेला) उभा केलेला दिसतो. जाफरी यांनी मोदींना फोन केल्याचे इम्तिायाज पठाण खोटे सांगतो. त्या काळात मोदी मोबाईलही फार कमी वापरत असत. पठाण यानी हा दावा पहिल्यांदा नोव्हेंबर २००९ मध्ये केला, त्याने पोलिसांना २००२ साली दंगलींनंतर लगेच दिलेल्या वाक्यात असा कुठलाही आरोप केला नाही. त्या दिवशी मोदींच्या कार्यालयातील फोनच्या सर्व लाइन्स अत्यंत व्यस्त होत्या. इम्तियाज पठाणचे असेही म्हणणे आहे की पोलीस सर्व घडून गेल्यानंतर संध्याकाळी ४:३०-५:०० वाजता तेथे पाचले. पण २८ फेब्रुवारी  २००२ ला ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दुपारी २ वाजून ३४ मिनिटांनी ऑनलाइन प्रकाशित केलेली बातमी आपण पाहिली आहे की पोलीस आणि अग्निशमन दल फार आधीच घटनास्थळी पोचले होते. प्रत्यक्षात या घटनेत पोलिस गोळीबारात ५ लोक जागी ठार आणि ११ जखमी झाले. 

 

   इथे आणखी काही प्रश्‍न उपस्थित होतात. आपला जीव वाचविण्यासाठी कॉंग्रेसचे ५०० कार्यकर्ते पाठवावेत, असा फोन जाफरी यांनी एखाद्या कॉंग्रेस नेत्याला का केला नाही? त्यांनी तेही केले, असे म्हणतात. मग आपल्या माजी खासदाराचा जीव वाचविण्यासाठी कॉंग्रेेस पक्षाने काहीच का केले नाही? या प्रकरणातील सर्वांत महत्त्वाचे आरोपी म्हणून एस.आ.टी.ने कॉंग्रेस नेते मेघसिंह चौधरी यांना अटक केली. ही अटक गुजरात पोलिसांनी केली नव्हती.

 

   सांप्रदायिक दंगलींमध्ये पीडित असलेल्या अल्पसंख्यक महिलांच्या कहाण्या माध्यमे अनावश्यकपणे वाढवून सांगत आहेत, असे राष्ट्रीय महिला आयोगाने तेव्हा म्हटले होते. तहलका वेबसाइटने २२ एप्रिल २००२ च्या बातमीत म्हटले, ‘राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य नफीसा हुसेन यांनी नोंदीवर म्हटल्यानुसार गुजरातमधील सांप्रदायिक दंगलीत पीडित अल्पसंख्य समाजाच्या महिलांवर झालेला हिंसाचार माध्यमांनी आणि अनेक संघटनांनी प्रमाणाबाहेर वाढवून सांगितला आहे.’ महिला आयोगाच्या एका मुस्लिम सदस्याचे हे म्हणणे होते.

कल्पित कथा

 २००२ मध्ये गुजरातमध्ये राहणे धोकादायक झाले होते

सत्य- ‘इंडिया टुडे’ने २५ नोव्हेंबर २००२ च्या अंकात एक जनमत चाचणी प्रसिद्ध केली. त्यात एक प्रश्‍न विचारण्यात आला होता, ‘आज गुजरातमध्ये राहताना तुम्हाला सुरक्षित वाटते का?’ या प्रश्‍नाला ६८ टक्के लोकांनी होकारार्थी म्हणजे ‘सुरक्षित वाटते’ असे उत्तर दिले. ५६ टक्के मुस्लिमांनी आपण सुरक्षित वाटत असल्याचे म्हटले. या संपूर्ण जनमत चाचणीवर मत व्यक्त करताना ‘इंडिया टुडे’ने म्हटले:  “मुख्यमंत्र्यांच्या आक्रमक भूिमकेमागे मतदार ठामपणे उभे आहेत. दंगली या गोधराची प्रतिकिया होत्या, या त्यांच्या (मुख्यमंत्र्यांच्या) म्हणण्याला लोकांचा पाठिंबा आहे. गुजरातच्या बाहेर राहणारयांनी राज्याला लज्जास्पद ठरविले (बदनाम केले), या मुख्यमंत्र्यांच्या आरोपालाही त्यांनी मान्यता दिली आहे. आणि गुजरात राज्य राहण्यासाठी धोकादायक झाले आहे, असे सुचविणारया शक्यताही लोक तुच्छ्पणे धुडकावून लावतात.”

(संदर्भ: http://archives.digitaltoday.in/indiatoday/20021125/cover2.html )

कल्पित कथा

गुजरात दंगली १९८४ च्या शीखविरोधी दंगलींसारख्या होत्या

सत्य – या दोन्ही दंगलींमध्ये दिवस-रात्रीचे अंतर होते. एन.डी.टी.व्ही. (या वाहिनीचे मालक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या [CPM] प्रमुख नेत्यांचे जवळचे नातेवाईक आहेत) आणि इतर खोटारडे, यांनी या दोन्ही दंगलींबाबत अनेकदा देशाची मुद्दाम दिशाभूल केली. ‘खबरों की खबर’ या एन.डी.टी.व्ही.वरील कार्यक्रमात सूत्रसंचालक विनोद दुआ यांनी मे-जून २००५ च्या कार्यक्रमात प्रेक्षकांना एक प्रश्‍न विचारला- 

 

   “यापैकी कोणता मुद्दा आपल्याला चिंताजनक वाटतो?

१. सचिन तेंडुलकर जखमी होणे

२. चित्रपटावरील प्रश्‍न

३. भाजपा आणि कॉंग्रेसवर गुजरात आणि १९८४ च्या दंगलींचा लागलेला कलंक”

 

   हे प्रश्‍न खास मार्क्सवादी पद्धतीचे पर्याय देणारे आहेत. तिसरया पर्यायामध्ये सत्य गुंडाळून ठेवायचे आणि १९८४ च्या दंगली आणि गुजरातच्या २००२ च्या दंगली सारख्याच असल्याचे दाखवत कॉंग्रेसप्रमाणे भाजपाने दंगली घडविल्या, असे म्हणण्याचा प्रयत्न होता.

 

   गुजरात दंगली आणि १९८४ च्या दंगली यामध्ये नेमके फरक कोणते आहेत, ते आपण पुढील प्रकरणात सखोल पाहूच. १९८४ च्या दंगली नवी दिल्लीबरोबरच पश्चिम बंगाल, त्रिपुरामध्येही झाल्यात, तर २००२ मध्ये गोधरामुळे गुजरातबाहेर एकही दंगल झाली नाही. (मोदींनी आपल्या मुलाखतीत, जी आपण कल्पित कथा १ मध्ये बघितली, महाराष्ट्रासारख्या इतर राज्यात मेलेल्या लोकांचा उल्लेख केला, त्या दंगली गोधरानंतर अनेक महिन्यांनी झालेल्या वेगळ्या दंगली होत्या.) दोन्ही दंगलींच्या एकूण स्वरूपामध्ये तर फरक होताच, पण या दंगली हाताळण्याच्या सरकारच्या पद्धतीतही मोठा फरक होता. हे तपशील आपण पुढील प्रकरणात पाहूच.

कल्पित कथा

 गुजरात सरकारचा दंगलींत सहभाग होता

सत्य – राज्यामध्ये मश्रूमसारख्या वाढणारया मदरशांकडे नरेंद्र मोदींच्या भाजपा सरकारने कानाडोळा केला. एवढेच नव्हे, तर त्यापूर्वीच्या केशुभाई पटेल सरकारनेही त्याकडे तेवढेच दुर्लक्ष केले. भाजपाने नव्याने धारण केलेल्या ‘धर्मनिरपेक्ष’ प्रतिमेला धक्का पोचू नये, म्हणून मदरशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही केले नाही, असे ‘इंडिया टुडे’च्या १८ मार्च २००२ च्या अंकावरुन आपल्याला समजते. त्यात म्हटले आहे:

 

   ‘‘धर्मांध, अतिरेकी विचार पसरविणारया मदरशांवर नियंत्रण ठेवले गेले नसल्यामुळे राज्यात मुस्लिमविरोधी विद्वेष पसरला , ज्याचा या दंगलींच्या रुपात स्फोट झाला, अशी सर्वसाधारण समजूत आहे. राज्यातील धर्मांध मदरसे थांबविण्यात अधिकरयांना अपयश का आले, हा मुद्दा जोरदार चर्चेत आहे. धर्मांध मुस्लिमांवर कठोर कारवाई न करण्यामागे आपली नवी धर्मनिरपेक्ष प्रतिमा अडचणीत येण्याची भीती भाजपाला वाटत होती का? की ही सामान्य प्रशासनीय कमतरता होती?’’

 

   याचा अर्थ भाजपाला आपली ‘धर्मनिरपेक्ष’ प्रतिमा धोक्यात येण्याची भीती होती. कदाचित असे नसते, तरी सरकार दंगलींवर नियंत्रण ठेवताना कार्यक्षम, निष्पक्ष राहू शकले असते. पण गुजरातच्या भाजपा सरकारला आपल्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेची आणि रा.लो.आ.तील इतर पक्षांची काळजी असल्यामुळे ते दंगली थांबविण्याचा किंवा दंगली न होवू देण्याचा निर्धार करून कामाला लागले. २७ फेब्रुवारीलाच सरकारने उपलब्ध सर्व ७० हजार पोलीस तैनात केले, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ८२७ लोकांना अटक करण्यात आली. गोधरामध्ये दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश २७ फेब्रुवारीलाच देण्यात आले, तर इतरत्र २७ फेब्रुवारीनंतर लगेच देण्यात आले. जलद कृती दलाचे जवानही लगेच तैनात करण्यात आले होते. हे आपण तिसरया प्रकरणात विस्ताराने पाहिले आहे.

 

   आपल्या ‘मोदी हटाव’ आंदोलनात नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने २१ एप्रिल २००२ नंतर दंगली भडकवल्या, असा आरोप केला जातो. त्याला मोठा आधार आहे, असे दिसते. गुजरात दंगलींवर ६ मे २००२ ला राज्यसभेत चर्चा झाली. या चर्चेमध्ये मतदान होणार असल्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांची मतेही महत्त्वाची होती. मोदी सरकारविरोधात रालोआतील हे िमत्रपक्ष भाजपा-विरुद्ध जावेत, यासाठी कॉंग्रेसने दंगली घडवून आणल्या, असा आरोप आहे. या दंगलींमुळे मित्रपक्ष बिथरले होते. आणि ते विरोधात मतदान करतील आणि रालोआ सरकार पडेल, अशी कॉंग्रेसला आशा होती, असा आरोप आहे. आपण त्याचे तपशील नंतर एका प्रकरणात पाहूच.

 

   गुजरातमध्ये पहिले ३ दिवस झालेल्या दंगली हा गोधरा हत्याकांडाचा थेट परिणाम होता. पण गोधरा हत्याकांड हेच काही स्थानिक मुस्लिम कॉंग्रेस नेत्यांच्या कारस्थानाचे फलित होते. गोधरा हत्याकांड घडल्यानंतर माध्यमांनी आणि राजकीय नेत्यांनी ज्या प्रक्षुब्ध करणारया प्रतिक्रिया दिल्या, त्यातून नंतरच्या दंगली उद्भवल्या. गुजरात कॉंग्रेसचे प्रदेशाध्क्ष आणि माजी मुख्यमंत्री अमरसिंह चौधरी (१९४१-२००४) यांनी ‘कारसेवकांच्या चिथावणीमुळेच गोधरा हत्याकांड झाले’ असा आरोप २७ फेब्रुवारीला रात्री टी.व्ही.वर येऊन केला. कारसेवकांनी गोधरा रेल्वे प्लॅटफॉर्मवर चहानाश्त्याचे पैसे दिले नाहीत, हे त्यांनी दिलेले चिथावणीचे कारणही काल्पनिकच होते. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने ५ मार्च २००२ च्या अंकात दिलेल्या वृत्तात म्हटले की गोधरा हत्याकांडात कॉंग्रेसचे नेते आरोपी आहेत, त्यांची नावे दिली ती अशी –

१. गोधरा नगरपालिकेचे अध्य्क्ष आणि कॉंग्रेसच्या अल्पसंख्यक आघाडीचे जिल्हा संयोजक मेहमूद हुसेन कोलोटा

२. पंचमहल यूथ कॉंग्रेसचे अध्यक्ष  सलीम अब्दुल गफार शेख

३. प्रमुख कॉंग्रेस कार्यकर्ते अब्दुल रहमान अब्दुल मजीद घांटिया

४. जिल्हा कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस फारुख भाना

५. प्रमुख कॉंग्रेस कार्यकर्ते हाजी बिलाल

 

   गोधरा हत्याकांडाबद्दल न्यायालयाने फेब्रुवारी २०११ मध्ये एकूण ३१ लोकांना दोषी ठरविले. त्यामध्ये वरील ५ लोकांपैकी तिघांचा समावेश होता. त्यात हाजी बिलाल याला फाशी सुनविण्यात आली तर अब्दुल रहमान अब्दुल मजीद घांटिया आणि फारुख भाना या दोघांना जन्मठेप झाली. गुजरात उच्च न्यायालयानेही तिघांनाही दोषी ठरवून जन्मठेप दिली.

कल्पित कथा

फक्त मुस्लिमच बेघर झाले आणि त्यांचेच आर्थिक नुकसान झाले

सत्य – ५ मार्च २००२ ला सुरू झालेल्या ९८ निर्वासित शिबिरांपैकी ८५ मुस्लिमांसाठी, तर १३ हिंदूंसाठी होती. २५ एप्रिल २००२ ला निर्वासितांची एकूण संख्या १ लाख ४० हजार होती, त्यापैकी १ लाख मुसलमान आणि ४० हजार हिंदू होते. अहमदाबादमध्ये दंगलींनी पीडित असलेल्या हिंदूंवर ‘इंडियन एक्स्प्रेस’ने २ पूर्ण वार्तांकने केली आहेत, त्यापैकी एक ७ मे २००२ ला आणि दुसरे १० मे २००२ ला प्रसिद्ध झाले. अहमदाबादमध्ये मुस्लिमांनी दलितांवर हल्ले करून त्यांना बेघर केले. 

 

   ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या बातमीप्रमाणे १७ मार्च २००२ पर्यंत केवळ अहमदाबादमध्ये १० हजारहून अधिक हिंदू  बेघर झाले. ही फक्त अहमदाबादची कथा आहे. बडोद्यासारख्या इतर महत्त्वाच्या शहरांत हिंदूंचे काय झाले, याचा उल्लेखही नाही. या बातमीमध्येच आणखीन एक महत्त्वाची गोष्ट दिसते की अहमदाबादमध्ये २८ फेब्रुवारीलाच कोणतीही चिथावणी नसताना मुस्लिमांनीही हिंदूंवर काही भागात हल्ले केले जसे बापूनगर आणि जमालपुर. अहमदाबादमधील मुस्लिमबहुल भागात अल्पसंख्येत राहणारया हिंदूंना याची भयंकर झळ सोसावी लागली. मुस्लिम हल्ल्यांची अशीच भीषण झळ दलितांना विशेषत: बसली.

 

   हिंदूंचेही मोठे आर्थिक नुकसान झाले. बडोद्यामध्ये मुस्लिमांनी हिंदूंची किमान ३६ दुकाने लुटल्याची बातमी ‘द ट्रिब्र्युन’ने ३० एप्रिल २००२ ला दिली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या बातमीनुसार २१ मार्च २००२ ला अहमदाबादमधील रेवडी बाजारातील हिंदूंची ५० दुकाने मुस्लिमांनी जाळली. हे आर्थिक नुकसान १५ कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. इतर गुजरातमध्येदेखील आणखीन हिंदूंची दुकाने लुटण्यात किंवा जाळण्यात आली. 

कल्पित कथा

गुजरात दंगल, हे भारतातील सर्वांत भयंकर हत्याकांड होते.

सत्य – स्वातंत्र्यापूर्वी १९४० च्या दशकामध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या दंगली किंवा १९६९ मध्ये झालेल्या गुजरात दंगली, यांच्याशी तुलना करता, गुजरातमधील २००२ च्या दंगली खूपच कमी गंभीर होत्या. १९४० च्या दशकातील दंगलींत तर हिंदूंनी खूप मार खाल्ला होता. गुजरातमध्ये मोठ्या दंगली १९८०, १९८५, १९९० आणि १९९२ मध्येही झाल्या होत्या.

 

   कॉंग्रेसच्या राजवटीत १९८४ मध्ये नवी दिल्लीत झालेल्या दंगली फार अधिक भयंकर होत्या. या दंगलीत अधिकृतपणे ३ हजार लोक मारले गेले. या दंगली केवळ नवी दिल्लीपुरत्या मर्यादित नव्हत्या. त्रिपुरा, पश्‍चिम बंगालसारख्या, नवी दिल्लीपासून खूप लांब असलेल्या प्रदेशातही दंगली झाल्यात. जम्मू-काश्मीरमध्ये १९८९ पासून ४० हजार भारतीय मारले गेले. या तुलनेत २००२ च्या गुजरात दंगलीत २ हजार मुसलमानांच्या जमावाने गोधरा हत्याकांड घडविल्यानंतरही, झालेल्या दंगलीत १२०० पेक्षा कमी लोक मारले गेले. या मृतांपैकी २५० हून अधिक जण तर हिंदूच होते. ‘गोधरा’नंतर झालेल्या दंगली ना नरसंहार (‘massacre’) होत्या ना हत्याकांड (‘pogrom’). देशातील सर्वांत भयंकर नरसंहार’ तर सोडाच, याला साधे ‘नरसंहार’ (‘massacre’) ही म्हणता येणार नाही. असे असतानाही तिस्ता सेटलवाड, हर्ष मंदर, अमूल्य गांगुली, प्रफुल्ल बिडवई यांच्यासारखे स्वंघोषित धर्मनिरपेक्षतावादी किंवा तहलका आणि मोदींचे राजकीय विरोधक, यांनी २००२ च्या दंगलींना ‘गुजरात नरसंहार’ असे म्हणण्यास सुरुवात केली आणि ‘गुजरातमधील मुस्लिम नरसंहाराला नरेंद्र मोदींची संमती होती’ असेही सांगितले. गुजरातमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या केवळ १० टक्के असताना, भाजपाचे सरकार आणि नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाही मुस्लिमांनी गोधरा नंतरही ४० हजार हिंदूंना बेघर केले. 

 

   आतापर्यंतचे सर्वांत भयंकर हत्याकांड मध्ययुगीन काळात हिंदूंचे झाले होते. १३९९ मध्ये तिमूर याने दिल्लीत एका दिवसात १ लाख हिंदूंचे हत्याकांड केले. नादिरशहा या आक्रमकाने १७३९ मध्ये दिल्लीत मोठे शिरकाण केले. मध्ययुगातील हिंदूंची ही भयंकर हत्याकांडे पाहिल्यानंतर हिटलरने १९३० च्या दशकात गॅस चेंबरममध्ये ज्यूंचे केलेले हत्याकांडही िफके वाटते. मध्ययुगातील हिंदूंची झालेली हत्याकांडे अकबरासह सर्व मुस्लिम सत्ताधारंनी केली होती. फेब्रुवारी १५६८ मध्ये अकबराने ३० हजार हिंदूंना ठार करण्याचा आदेश दिला होता. पहिल्या प्रकरणात आपण भारतावरील मुस्लिम आक्रमणांची आणि त्यांनी केलेल्या हत्यांची छोटीशी यादी पाहिली आहे.

 

   पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन्ही देश १९४७ पूर्वी भारताचाच भाग होते. फाळणीच्या वेळी पाकिस्तानात असलेल्या हिंदूंची संख्या २० टक्क्यांवरून आता १ टक्क्यावर आली आहे. अलीकडच्या काळातला हा सर्वांत मोठा प्रसिद्ध न झालेला नरसंहार, हत्याकांड आहे. आजच्या आधुनिक, प्रगतिशील युगात मात्र हिंदूंना काही ठिकाणी, जसे पाकिस्तानमध्ये, कोल्ह्यांच्या दयेवर सोपविण्यात आल्यामुळे सर्वाधिक नुकसान सोसावे लागत आहे. आजच्या बांगलादेशमध्ये विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून राहणारया हिंदूंची टक्केवारी कमी होत चालली आहे- १९०१ मध्ये ३४ टक्के असणारे हिंदू १९४७ मध्ये २९ टक्के झाले आणि २०११ मध्ये तेथील हिंदूंची संख्या केवळ ८.६ टक्क्यांवर आली. एवढेच नव्हे, तर स्वातंत्र्यानंतरच्या ६० वर्षांत भारतातील हिंदूंची संख्याही सुमारे ५ टक्क्यांनी कमी झाली. १९५१ मध्ये हिंदू ८५ टक्के होते, ते २०११ मध्ये ७९.८ टक्के झाले. पाकिस्तानमधून हिंदू जवळजवळ नाहीसे झाल्याचा मुद्दा सरकारने, मानवी हक्क कार्यकर्त्यांनी किंवा स्वत:ला उदारमतवादी म्हणविणारया माध्यमांनी कधी जगासमोर मांडला नाही. याउलट भारतीय माध्यमे आणि मुस्लिम प्रचारकांनी गुजरात दंगलींचा मुद्दा अतिशय अतिशयोक्तिपूर्ण वाढविला आणि गेल्या ७० वर्षांत पाकिस्तान, बांगलादेश आणि काश्मीरमधील हिंदूंच्या नरसंहारावर रंगसफेदी केली.

 

   पाकिस्तानमधील सर्वांत मोठे हिंदू नेते सुदामचंद चावला २९ जानेवारी २००२ ला आपल्या राईसमिलमधून परतत असताना जाकोबाबादमध्ये त्यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. त्यांच्या खुन्यांना कधीच शिक्षा झाली नाही. आपल्या जिवाला धोका आहे, अशी तक्रार श्री. चावला अनेक वर्षे पाकिस्तान मानवी हक्क समितीकडे आणि नागरी संघटनांकडे वारंवार करीत होते. (पण त्यांना कोणीच संरक्षण दिले नाही.) ही जर सर्वात मोठ्या हिंदू नेत्याची कथा असेल, तर २० टक्क्यांहून केवळ १ टक्क्यावर पोचलेल्या सर्वसामान्य हिंदूंची कथा काय असेल? http://www.sudhamchandchawla.com 

 

   स्वतंत्र आणि आधुनिक भारतातील हिंसाचाराच्या इतर अनेक घटनांशी तुलना करता २००२ च्या गुजरात दंगली काहीच नव्हत्या. देशाच्या स्वातंत्र्यानंतर काश्मीरमध्ये सुरू असलेले हिंदूंचे हत्याकांड सर्वांत भयंकर आहे आणि ते अद्यापही अधून-मधून होते. १९८४ मध्ये सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाच्या समर्थकांनी शिखांचे भीषण हत्याकांड केले. बिहारमध्ये कॉंग्रेस सत्तेवर असताना भागलपूरमध्ये झालेल्या दंगलीत १९८९ मध्ये १ हजार लोक मारले गेले, त्यापैकी बहुसंख्य मुस्लिम होते. मुस्लिमांनी हिंदू वस्त्यांवर बॉंब फेकल्यामुळे ही दंगल उद्भवली, असा आरोप आहे. आसाममध्ये १९८३ मध्ये (कॉंग्रेस सत्तेवर असताना) दंगलीच्या एकाच प्रकरणात २१०० लोक मारले गेले.



कल्पित कथा

गुजरातचे पोलीस मुस्लिमविरोधी होते.

सत्य– याउलट माध्यमांनी आपल्याला ‘मुस्लिमविरोधी’ ठरवू नये, म्हणून मुस्लिम धर्मांधांना पकडतानासुद्धा पोलीस १० वेळा विचार करीत होते. पोलीस गोळीबारात मारल्या गेलेल्यांमध्ये पहिल्या ३ दिवसांत बहुसंख्य हिंदू होते (९८ पैकी ६०). ६ एप्रिल २००२ पर्यंत पोलीस गोळीबारात एकूण १२६ लोक ठार झाले, त्यापैकी ७७ हिंदू होते. १८ एप्रिल २००२ पर्यंत पोलीस गोळीबारात मुस्लिमांपेक्षा जास्त हिंदू मारले गेले. ७४ दिवसांच्या एकूण दंगलकाळात पहिल्या ३ दिवसांत हिंदू आक्रमक होते. याउलट ७४ पैकी कदाचित ७३ दिवस मुस्लिम आक्रमक होते. पहिल्या दिवशी, म्हणजे २८ फेब्रुवारी २००२ ला पोलीस गोळीबारात ठार झालेल्या १७ लोकांपैकी ११ लोक हिंदू होते. २८ फेब्रुवारीलाच अहमदाबादमधील बापूनगर आणि जमालपूर भागामध्ये मुस्लिमांनी हिंदूंवर हल्ले चढविले. दुसरया आणि तिसरया दिवशी हिंदू आणि मुस्लिम दोघेही एकमेकांवर हल्ले चढवीत होते. त्यामुळे पोलीस गोळीबारात दोन्हीकडील लोक मारले गेले. पहिल्ल्या ३ दिवशी, म्हणजे २८ फेेब्रुवारीला नरोडा पाटिया, गुलबर्ग सोसायटी, सदरपुरा, पंडरवाडा अशा ४-५ ठिकाणी मुस्लिमांच्या मोठ्या प्रमाणात हत्या झाल्या, आणि हिंसक जमावांच्या संख्येच्या तुलनेत पोलीस अगदीच कमी असल्याने गोळीबारात फार जास्त लोकांना मारू शकले नाही. १ मार्च २००२ पासून मुस्लिम त्वेषाने आक्रमण करून आले, त्यावेळी पोलीस गोळीबारात मुस्लिमही मारले गेले, कारण तेव्हा स्थिती आटोक्याबाहेर नव्हती. २५ एप्रिल २००२ पर्यंत ७७ ते ८० हिंदू पोलीस गोळीबारात मारले गेले, तर मुस्लिमांची संख्या ९३ होती. मुस्लिमांचा आकडा का वाढला, याचा खुलासा वर आलाच आहे. १८ एप्रिल २००२ पर्यंत अधिक हिंदू पोलिस गोळिबारात मेले, मुसलमान कमी.

 

   काही ठिकाणी मुस्लिमांनी पोलीस आणि लष्करावर गोळीबार केला. वीज बंद करून, मानवी साखळी करून सशस्त्र गुन्हेगारांना वाचविले, अनेक ठिकाणी दंगली सुरू केल्या आणि तरीही पोलिसांवरच ते पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप केला. आपल्यावर ‘मुस्लिम विरोधी’ असा शिक्का मीडियात मारला जाईल, या भीतीपोटी पोलीस आपले कर्तव्य योग्य पद्धतीने बजावू शकले नाहीत.

 

   ‘इंडिया टुडे’ साप्ताहिकाने आपल्या २० मे २००२ च्या अंकात हे स्पष्टपणे मान्य केले आहे की मुस्लिम धर्मांध आणि दंगलग्रस्तांवर पोलिसांनी तातडीने कारवाई केली नाही, कारण त्यांना ‘मुस्लिमविरोधी’ असा शिक्का बसण्याची भीती वाटत होती. हा वृत्तांत म्हणतो : ‘‘मुस्लिमांनी पोलिसांवर एकापाठोपाठ एक केलेल्या हल्ल्यांमुळे परस्परांचा विश्‍वास जास्तच उध्वस्त झाला आहे. पोलिसांना ‘मुस्लिमविरोधी’ हा शिक्का बसल्यामुळे ते आता मुस्लिम धर्मांधांना पकडण्यात काचकूच करीत आहेत.”  

(संदर्भ : http://archives.digitaltoday.in/indiatoday/20020520/states2.html )

 

   पोलिसांनी २८ एप्रिल २००२ पर्यंत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जवळपास १८ हजार हिंदूंना ताब्यात घेतले, तर दंगल माजविण्याच्या आरोपावरून १० हजार हिंदूंना अटक केली, असे जवळपास २८,००० हिंदू एकूण अटक केलेत, तर ७६५१ मुसलमानांना अटक केली (प्रतिबंधात्मक व दंगलींसाठी), असे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने २८ एप्रिल २००२ ला दिले आहे.  या संपूर्ण दंगलींप्रकरणी एकूण ४,२७४ केसेस नोंदविण्यात आल्यात. 

 

   १९,२०० हिंदू आणि ७,७९९ मुस्लिमांना अटक करण्यात आली. हा एकूण आकडा २६,९९९ म्हणजे २७ हजार आहे. ऑक्टोबर २००५ पर्यंत २५,२०४ लोकांना अटक झाली होती. अटकेचा अखेरचा आकडा थोडा वाढला आहे, व २०१२ साली अटकींची संख्या २६९९९ म्हणजे सुमारे २७००० होती. खटले भरून ते पूर्णत्वाला नेण्यामध्येही पोलिसांनी कार्यदक्षता दाखविली. त्यामुळे गोधरा आणि नंतरच्या दंगलींमध्ये विविध खटल्यात किमान ४८५ लोकांना दोषी ठरविण्यात आले. त्यापैकी ३७४ लोक हिंदू आणि १११ मुस्लिम होते.

कल्पित कथा